Sunday, February 19, 2023

शांतता (महाकोठ्ठीत)


                🌻  • शांतता
                            (महाकोठ्ठीत)

                 हे काही अचानक घडले नाही आहे. काय झालं ते काय कळत आहे का ? काहीही न करता हे मात्र शक्य नाही.... नेमकं काय केलं हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही.अशी ही अवस्था.ही इथे या ठिकाणी निर्माण झालेली प्रचंडावस्था आहे.ज्याच्यामध्ये ही स्फुरलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची विश्वं विविध प्रकारच्या पातळीवर वावरताना दिसतात.
                  हे मी माझ्या बद्दलच बोलतोय असे नाही. पण स्वप्न असते प्रत्येकाचे वर जाण्याचे! स्वप्न म्हणजे ईच्छा असते.अपेक्षा असते.महत्वाकांक्षा असते.वर गेले पाहिजे.वर जाता आले पाहिजे.वर जाता येऊ शकते का? वर जाता येणे शक्य आहे का?....... ते शक्य असल्याशिवाय का इतकी प्रारुपे दृश्यमान स्वरूपात दिसतात! ही प्रारूपे आहेत तरी कशाची?.. ही प्रारूपे आहेत मार्गांची.
                 वर जाणे शक्य आहे..... जिथून वर जायचे आहे. तिथे आपण किती काळ होतो.याचे ज्ञान असणे किंवा ते ज्ञान नसणे याचा वर जाण्याच्या या प्रयत्नांना काहीही मागमूस असावा हे काही अत्यावश्यक नाही.मन शांत झालं की वर जाता येते.हे मनाच्या शांततेचं शांत होणं सरेआम जसं आपल्याला वाटतं तसं साधंसुधं नाही.ते उपशांत होणे आहे. उपशांत होणे हे गंभीरपणा सशक्त होऊन सर्वतोपरीने साधा - सरळ आणि सर्वतोमुखी होतो तेव्हा ते अस्सल अर्थ धारण करणे असे होते. हे चांगल्याप्रकारे लक्षात घेतले पाहिजे.
                 आता , तो वर जातो. त्याचे हे वर जाणे त्याने आधीच ठरवलेले होते.त्याला नेमके कुठे जायचे आहे हे निश्चित चित्र काढता येत नसते.ते चित्र अस्तित्वातच नसते.जेव्हा तो वर जातो तेव्हा तिथे गेल्यावर त्याला ती भूमी दिसते.तो ती भूमी जाणतो तेव्हा ही भूमी मला आधीपासूनच ठाऊक होती असे त्याच्या लक्षात येते आणि त्याच्या आनंदाचा विस्तार होत जातो.त्या भूमीत आल्यानंतर त्याचं बोलणं निश्चित शहाणपणाचं होतं.त्याचं ते भाषणच होतं. त्याला मन्तभाणी असे म्हटले आहे.त्याचं ते जे  भाषण होतं ते इतकं शहाणपणाचं , इतकं प्रज्ञामय  आणि लोभस की ते पाहाणाऱ्या ऐकणाऱ्याला ऐकत-पाहात  रहावस वाटावं.असं असतं ते.
            त्यात उध्दटपणाच्या अक्षराचा गंधही नसतो.
            त्यांचं भाषण आता अनुद्धट झालं आहे.

पण तो माणूसच आहे.माणूस आहे म्हणून अनेक प्रसंग येतात.जेव्हा माणुसकीला लांछन लावणाऱ्या काही कृती पाहण्याचे प्रसंग जर येत असतील तर त्या प्रसंगांना सामोरे जाता येते.तिथे जाऊन आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार जर आला असेलच तर त्याला तो धुनकतो.गादीवर काठ्या मारून मारून त्या गादीतला रू एक प्रकारे झटकून काढतो.रू कापूस असताना कापूस पिंजून काढतो. त्यातला रु आणि सरकी वेगवेगळी करतो असे करणाऱ्या त्या पिंजाऱ्यासारखा हा माणूस.तो विकारी आचरण खल्लास करतो आणि अस्सल वर्तन जे नितळ मनाने कार्यान्वित झाले आहे ते कायम ठेवतो.

ते असेही सांगता येईल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या वाळलेल्या पानाला हवेची एखादी झुळूक जरी आली तरी ती झर्रकन उडवून नेते. त्याप्रमाणे तो विकाराला उडवून लावतो.हे तो कसे करतो ? तो करतो.ते आता त्याच्या हातातच असते.आता त्याला दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज भासत नाही.स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या विचाराला तो स्वतः ठरवू शकतो.विचार कशाबद्दल आहे? रागाचा आहे. मोहाचा आहे. द्वेषाचा आहे. की प्रेमाचा आहे. बांधिलकीचा आहे.बंधुभावाचा आहे.एवढंच नाही, तो त्यावर प्रक्रिया करू शकतो. रागाचा असेल तर तो त्याला चिमटीत पकडून ठेवतो. मोहाचा ,द्वेषाचा असेल तर त्या वाळलेल्या पानासारखा भिरकावून देतो त्याला.जर प्रेमाचा असेल.बांधिलकीचा असेल.बंधुभावाचा असेल.तर त्याची तो जोपासना करतो.वाढ करतो.या परिवर्तनाच्या पातळ्या अत्यंत तरलतेने त्याच्या बोलण्यात येतात.त्याच्या मन्तभाषणात येतात. त्याच्या गंभीरपणाने त्याची जी शांतता झालेली दिसते आहे, ती शांतता जो गंभीरपणा धारण करते आहे तो हा गंभीरपणा काही साधासुधा नसतो.तो जो अत्यंत प्रयत्न करत आहे त्यातून त्याला प्राप्त झालेला हा स्वभाव आहे .
                     तो आता हे जाणतो की मी आता वर आलेला आहे.मी आता अशा भूमीत आलेला आहे की ज्या भूमीतून मी कोणत्याही विकाराकडे पाहू शकतो. विचारांकडे पाहू शकतो.त्या विचारांना विकार असेल तर विकार.विचार असेल तर विचार जे काय असेल असे त्यांना ओळखू शकतो.आणि जर मी हे ओळखू शकत असेल, त्यांना नाव देऊ शकत असेल तर नाम आणि त्याचं रूप एकच आहे मी जाणणारा असल्यामुळे मला त्याच्यावर प्रक्रिया करता येते.जर मला या विचारांवरच प्रक्रिया करता येत असेल तर मला त्या विचारांमध्ये अडकून पडण्याची काय आवश्यकता ऊरत नाही. त्या विचारांमध्ये लिप्त होणं अशक्य ठरतं.ते विचार म्हणजे मी असा होत नाही तर माझ्यामध्ये ते उत्पन्न झालेले विचार आहे आणि ते विचार मी वाढवू शकतो किंवा मी ते विचार काढून टाकू शकतो म्हणून माझ्यामध्ये मी अशा प्रकारची एक अवस्था निर्माण झालेली स्वतःच पाहू शकतो. माझ्यामध्ये निर्माण झालेले हे विचार जर मी स्वतः पाहू शकत असेल तर मी इतरांच्या विचारांकडे सुद्धा पाहू शकतो.माझ्या विचारांमध्ये जर मी पाहू शकतो तर माझ्या मनामध्ये काहीही कोणत्याही प्रकारचं विचार म्हणून उरलेलं नाही.ते शून्य झालेलं आहे. मी एकही माझ्या सानिध्यात येत असतील तर त्यांना त्यांच्या विचारांसह पाहू शकतो.त्यांच्या विचारासह जर मला पाहता येत असेल तर त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न करणं हे मला सहज शक्य आहे. त्यांना माणुसकी प्रणित जीवन काय आहे हे सांगता येईल. सहज शक्य आहे ते.विचारातूनच माणूस बनतो. हे सगळ्या प्रयत्नांतून बघणे शक्य झालेले आहे. त्या माणसांमध्ये कोणता विचार उत्पन्न करावा हे मी माझ्या हातात ठेवले आहे.मी त्याच्या मध्ये कोणताही विचार उत्पन्न होऊ देऊ शकतो.मी शांत झालो.मी, वर्ग, माझी भाषा, बदल्यांच वर्तुळ पूर्ण झालेलं आहे.

• संजय प्रल्हादराव डोंगरे. 9420704580

एका विषयाची गोष्ट

*शांतता* 

http://www.dainikrajyonnati.com/2023/3610/
------------------------------
*दैनिक राज्योन्नती WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा* 
http://bit.ly/3Iwbw1B
------------------------------
*पश्चिम विदर्भात सर्वाधिक प्रसारित दैनिक*
------------------------------

Sunday, February 12, 2023

ऑक्सीजन

 ऑक्सिजन 

🌻ऑक्सीजन
ऑक्सिजन
गाडी आली नि ऑक्सिजनचे सिलेंडर टाकले. ते घ्यायलाही कुणीच नव्हतं. मग रस्त्यावरचे भिकारी पुढे सरसावले त्यांनी एकेक सिलेंडर डोक्यावर घेऊन गोदामात पोचवले. .... त्या दिवशी त्यांना गोदामातर्फे जेवण देण्यात आलं.
•
चर्चक
दोन मित्र आहेत.एकाच्या पायात लाल जोडा. एकाच्या पांढरा.पुलाजवळ पोचले. तिथे पाटी लिहिलेली आहे.एकावेळी एकच जाऊ शकेल. त्याच पाटीजवळ त्यांची चर्चा सुरु आहे . कोणी कुणाच्या खांद्यावर बसावं...
सायकल आणि घोडा ज्यांचे कडे आहे असे अनेक जण त्यांची चर्चा ऐकत त्यांच्याकडे पाहत आहेत..
•
स्वँब
दोन तास उभं राहून स्वँब देला.तो निगेटिव्ह आला. त्याचा आनंद गगनात मावेना. तो विचार करू लागला की असं कसं झालं. नक्कीच स्वँब घेणारा माणूस आपला असला पाहिजे....
•
प्रवाह
"प्रवाहाला नसतं कुठलंही वळण तो असतो अगदी सरळ जरा वरून पाहायचं असतं. माणसेच क्षणाक्षणाला वाकत असतात नि रस्ता वळला म्हणतात." रस्ता वळलेला नसतो असे आपल्या भाषणात जोरजोरात प्रतिपादन करून झाल्यावर साहेब समोरच्या पेल्यातले पाणी घटघट प्याले आणि खाली न बसता उभ्याउभ्याच स्टेजवरून खाली उतरले.
एका श्रोत्याच्या खिशातला एक रुपया छनकन खाली पडला तेव्हा तो घ्यायला तो वाकला. ... आणि सारी पब्लिक खदाखदा हसू लागली. वाकलेला माणूस कसा असतो हे त्यांना प्रात्यक्षिक दिसले होते.
•
कुठं?
“अन्न, वस्त्र,निवारा नको आम्हाला, काहीही नको..”, असे काकुळतीला येऊन तो कुटुंब प्रमुख बोलला. “मग तुम्ही चालले कुठं सगळेच्या सगळे?”  त्याने हातातली काठी ऊभी धरून ,दोन्ही हात जोडून त्या पोलिसांना नमस्कार केला. मागच्या सर्वांनीही त्याचे
अनुकरण केले.

आपण कुठं चाललो हे कुणालाच सांगता येत नव्हते.
•
आयडिया
जुने प्लास्टिकचे मग, स्क्रू, खिळे, प्लॅस्टिक पाईप, लाकडी काठी, वह्या, डायऱ्या, पेन, चुना, वॅक्स, रंग, स्टूल, पाळणे, दोरी, कपडे, टॉवेल ,रुमाल, सुई, दोरा, तार, वायर, बांगड्या, फोन, टी.व्ही., कॉम्प्युटर, घड्याळ,प्लेट,बॉल,पाणी,भाजीपाला,मच्छरदाणी…हे सगळं पुरेसं आहे घरात राहायला.

पैसा … ब्यांकेत कसा जमा होईल! हाच फक्त विचार आहे.
•
बोगदा
या टोकापासून तर त्या टोका पर्यंत एकही दुकान उघडं नाही.या रणरणत्या दुपारच्या उन्हात अंधाऱ्या बोगद्यात पडल्यासारखा तो उभा होता.त्याला पाहून कुत्रंही केकाटल नाही.जिकडे पाहावे तिकडे कुलपंच कुलुपं  दिसत होते."परत जावं नि नंतर यावं" असा
विचार त्याच्या डोक्यात आला.
पण, तो इतक्या दूर आला होता की. मागे फिरण्यात काहीही अर्थ नव्हता.
•
ड्युटी
कोविशील्डचा डोझ शिरींज मध्ये भरून झाल्यावर तिचं लक्ष दरवाज्याकडे गेलं.तिथे तो दिसला.तिने नाकातले पाणी ओढत खुर्चीवर बसलेल्या लाभार्थ्याच्या दंडाला डाव्या हाताने ओढले, इंजेक्शन टोचले आणि काढून डस्टबिन मध्ये टाकून आपल्या तळहातावर – या हाताने त्या हातावर बोळा फिरवीत म्हणाली,"कशाला आला या जीवघेण्या गर्दीत.आलीच असती मी." त्याने खाली पाहून दोन्ही खांदे उडवले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला.
•
        ० 🔅  संजय प्रल्हादराव डोंगरे 


Saturday, July 9, 2022

Wednesday, January 8, 2020

समता कॉलनी

अरिय परिवाराचे केरुबुवा गायकवाडांना अभिवादन व पुस्तक प्रकाशन संपन्न

दि.२४ मे २०१९ मे रोजी समता कॉलनी बुद्धविहार येथे अरिय परिवाराचे केरुबुवा गायकवाड यांना अभिवादन व डॉ अशोक इंगळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले अध्यक्ष स्थानी ना.मु.कांबळे तर प्रमुख अतिथी लोकशाहीर वसंतदादा मानवटकर, कवी भगवंत तायडे, मेजर आर. सी. भगत ,डॉ.भास्कर पाटील आणि अरिय चे संपादक संजय डोंगरे होते.
प्रारंभी तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,आणि केरुबुवा गायकवाड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
पाहुण्यांच्या स्वागतानंतर वसंतदादा मानवटकर यांनी केरुबुवांच्या पदांचे गायन व आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी केरुबुवा यांचे नातू राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या आठवणी सांगून इतिहासाला उजाळा दिला. संबंध कार्यक्रमाचे संचालन करीत असताना डॉ. अशोक इंगळे यांनी केरुबुवा गायकवाड यांची माहिती सांगितली.
दुसऱ्या टप्प्यात डॉ. अशोक इंगळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे या ग्रंथाचे प्रकाशन अध्यक्ष ना.मु.कांबळे आणि मान्यवर यांचे हस्ते संपन्न झाले याच प्रसंगी डॉ. संजय पोहरे यांच्या नवे गावकुस या एकांकिका संग्रहाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी बुद्धविहारास पुढील प्रमाणे पुस्तकांचे दान देऊन उपस्थितांनी आपल्या कविता सादर केल्या °संजय डोंगरे •अरिय वार्षिकांक 2016 पाच प्रति •अरिय वार्षिकांक2015 एक प्रत •अरिय वार्षिकांक2014 एक प्रत•धम्मसंगिती एक प्रत•धम्मवाक्य एक प्रत °मोहन शिरसाट -नाही फिरलो माघारी °सचिनकुमार तायडे -आसवांची शाई °अमोल बी शिरसाट-जातींचे निर्मूलन °प्रा. डॉ. भास्कर पाटील-•गौतम बुद्धाचे चरित्र•विश्व विजयी तिरंगा प्यारा•गोष्ट गोधराजाची•त्यांचं धोरण यांच मरण दोन प्रति °डॉ. अशोक इंगळे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे °शाहीर वसंत मानवटकर-•बोधिवृक्षाखालील काव्यफुलें•स्वागतगीते ° प्रा. संजय पोहरे-•आकांक्षा•नवे गावकुस °पंजाबराव वर-•भ्रूणकन्येचा टाहो •वऱ्हाडी झटका °शेषरावजी मनवर-मुलांसाठी बुद्धधम्म °प्रा. दिवाकर सदांशीव-राजर्षि शाहू विचार व कार्य ° विशाल नंदागवळी-मॅरेथॉन °भगवंत तायडे -•शिवलेले ओठ •लढे अंधश्रद्धेचे °नामदेवराव झोपुजी तायडे-बुद्ध आणि त्यांचा धम्म ° ना. मु. कांबळे-सुबोध धम्म प्रश्नोत्तरी ° राहुलबंधु गोपणारायन ° अनंत वानखडे °प्रजानंद उपर्वट ° देवानंद जवंजाळ °विनोद किरतकार °शीलवंत डोंगरे ° गजानन डोंगरे °विष्णू निंबाळकर °मेजर खडसे °वानखडे साहेब °कांबळे साहेब °अभिजित कांबळे यांनी इंग्रजी कविता सादर केली.

कार्यक्रमाला समता कॉलनी दीक्षा कॉलनी वॉर्ड न 15 मधील नागरिक आणि अकोला शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून कवी रसिकांनी उपस्थित राहून प्रबोधनाचा आनंद घेतला.या प्रसंगी आयोजकांतर्फे उपस्थितांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले.कविसंमेलनाचे संचालन गझलकार अमोल शिरसाट आणि या संबंध कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संजय पोहरे यांनी केले.
●





सहवास