•धम्मसभ्यता
सबंध भारतात आज पर्यंत धम्मसभ्यता विराजमान होणे अत्यावश्यक होते.
धम्मसभ्यता विराजमान न होण्यामागे आर्थिक दुरावस्था हे सर्वात मोठे कारण
आहे. अनेक अभ्यासकांनी ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. आणि हेच वास्तव आहे .
धम्मसभ्यता निर्माण करणारे लोक किंवा धम्मसभ्यता निर्माण करू शकणारे लोक
हे प्रामुख्याने नव दिक्षित अथवा नवबौद्ध आहेत.फार मोठ्या प्रमाणात ते
महार समाजातून आलेले आहेत. त्यांचे नंतर चांभार आणि मातंग आणि त्यांचे
नंतर ब्राह्मण,ओ.बी.सी.आहेत.असे असले तरीही.धम्मसभ्यता निर्माण-त्याची
रुजवणूक ही सगळी जबाबदारी ही बौद्धांची (पूर्वाश्रमीच्या महारांची) ठरते
. कारण आधुनिक काळातील तेच धम्माचे अग्र श्रावक आहेत .असे असतांनाही
बौद्ध लोकांकडून काम होतांना दिसत नाही.
वस्तुतः ही बौद्धांची जबाबदारी आहे. कारण बाबासाहेबांनी धम्म देतांना
म्हटले होते की.........अन्यथा हा धर्म महारांनी बुडविला असा संदेश जगात
जाऊ नये. बाबासाहेबांनी का म्हटलं असेल असं ? कारण महाराष्ट्र स्थापना ही
ई.स.पूर्व ७०० पासून आहे . डॉ.मा.प.थोरात आपल्या 'डॉ.आंबेडकर ,आधुनिक
विज्ञान आणि मानव ' या ग्रंथात म्हणतात की,सिंधू नदी काठचे लोक "मेलुहहा
" . दुष्काळ/अवर्षणामुळे ते सिंधू काठाहुन बाहेर पडले. शोध घेत
महाराष्ट्रात आले . नदीकाठी त्यांनी वस्त्या केल्या. त्यांनी गाव
शोधला.वसविला. म्हणून पाण्यावर पहिला हक्क त्यांचा . 'मेलुहवा' च अपभ्रंश
महार . आजही बौद्धांची मूळ घरे नदीकाठीच आहेत. पुराचा धोका होणार नाही
अश्या ठिकाणी . उंचावर.पाणी प्रथम घेता येईल.असे. पुढे बुद्ध काळात
महाराष्ट्रातला पहिला भिक्षु झाला भदंत पूर्ण . महाराष्ट्र दिनाच्या
अनुषंगाने ह्या आठवणी झाल्या. विस्तार भयास्तव मूळ विषयाकडे जात आहोत.
या बाबतीत आयु. आ.कि.सोनोने यांनी तिसऱ्या पिढीला जबाबदार ठरविले
आहे.आयु.आ.किं चा कवी म्हणून सर्व दूर परिचय आहेच . त्या सह ते धम्म
क्षेत्रातले मोठे कार्यकर्तेही आहेत . त्यांनी भिक्षुसन्घाच्या धर्तीवर
उपासक संघाची स्थापना केली.पूर्वी वंदना संघ असायचे.त्याचेच हे विस्तारित
रूप आहे.तर चर्चा पुढे नेतांना पिढ्यांचे कर्तृत्व असे सांगतात की,
पहिल्या पिढीने खूप संघर्ष केला. त्याची इतिहासात कुठेच तोड नाही . मी या
संघर्षाचे साद्धर्म्य भीमा कोरेगावच्या संघर्षाशी करीन . अर्थात हे माझे
वैयक्तिक मत आहे. पहिल्या पिढीच्या त्यागातून दुसऱ्या पिढीचे अंकुरणे हा
बुद्धधम्माच्या पुनर्जन्माचा मंगल अविष्कार होय.बाबासाहेबांनी मोठ्या
खुबीने तो अधिक्रमित केला. दुसऱ्या पिढीने बाबासाहेबांचा शब्द न शब्द
अंगिकारला . सार हृदय बौद्धमय होऊन गेलं.घर,दार,अंगण,गाव,विधी,सभ्यता सार
सार बौद्धमय होऊन गेलं.दुसऱ्या पिढीचे कष्टही अपार आहेत.पोटाला चिमटा
दिला.मांस खाणे बंद केले.मुलांना शाळेत टाकले.घरातले जुने देव
त्यागले.अश्याप्रकारे दुसऱ्या पिढीने दैनंदिन जीवनात बदल स्वीकारले.
सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी मानसिक बदलही मोठ्या धैर्याने स्वीकारले
. सबंध घरादाराने हा अध्यात्मिक बदल स्वीकारतांना त्यांना फार मोठ्या
आंतरिक संघर्षाला सामोरे जावे लागले असेल. गावाने,"बौद्ध झालात!" म्हणून
बहिष्कार टाकलेला आहे.हे सगळे भौतिक ,अध्यात्मिक आणि मानसिक ताण दुसऱ्या
पिढीने भोगले.ह्या सर्व भोगवटयाचे साक्षिदार आजही जीवंत आहेत. किंवा हा
भोगवटा ज्यांनी स्वतःच्या छातीत पाहून,लिहून,वाचून,ऐकून बंदिस्त करून
ठेवला आहे. असे जिगरबाज आंबेडकरी कार्यकर्तेही आहेत. हे सगळे भौतिक
,अध्यात्मिक आणि मानसिक ताण बोटांवर नाचवत .दुसरी पिढी मार्गक्रमण करीत
असतांना , धम्म सभ्यतेचे जाणीव पूर्वक वहन करीत येत होते .
तिसऱ्या पिढीने वयात आल्यावर काय केले? नोकरी केली. बहुतांश नोकरी कोणती
केली? थर्ड क्लास-फोर्थ क्लास . सेकंड क्लास ,फर्स्ट क्लास ची अगदी
नगण्या हूनही नगण्य उदाहरणे आहेत . या थर्ड क्लास -फोर्थ क्लास वाल्यांना
स्वतःला सावरण्यातूनच वेळ मिळाला नाही. दिवसभर नोकरी करणे . नोकरी
करतांना अनेक प्रकारचे तह स्वीकारणे. घरी आल्यावर . जेवण-खावण आणि झोप.
सकाळी परत तेच चक्र.जाणीवा मेल्यागत जगण. जगायचं कशासाठी ? तर खाण्या
साठी . पिण्यासाठी .झोपण्यासाठी. कुटुंबासाठी.घरासाठी. नातेवाईकांसाठी .
या चक्राचा व्यास विस्तारला तो जास्तीत जास्त नातेवाइकान्पर्यन्त. अश्या
स्थितीच वर्णन सुप्रसिद्ध हिंदी कवी 'उदय प्रकाश' यांनी सशक्त पणे केलं
आहे ते म्हणतात,
आदमी
जब मरता है
तब
वह बोलता नही, सुनता नही, सोचता नही
और
आदमी जब बोलता नही, सुनता नही, सोचता नही
तब
मरता है
खरेतर तिसऱ्या पिढीने आदर्श निर्माण करायला हवे होते. नवे नवे आयाम
निर्माण करायला हवे होते. नव्या मुल्यांची सशक्तपणे मांडणी करायला हवी
असते, नव्या प्रतिमांचे निर्माण. नव्या प्रतीकांचे रोपण , नवे नायक.(सिंह
सेनापती सारखे ), नव्या संकल्पना, नवे आकृतिबंध , नव्या चर्चा, नवे जगणे,
नवा पेहेराव, नवे अविष्कार असे सगळे जे जे नवे आहे ते ते आणि जे जे
धाम्मानुकुल आहे ते ते मांडायला हवे होते. पण तिसऱ्या पिढीने या कडे
अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांनी उणी दुणी काढण्यात आयुष्य खर्च केले. काय
नको यावरच ते बोलले. उणी दुणी काढतांना त्यांनी भांडणेही केली. भांड भांड
भांडले .आणि नंतर कुठेतरी जाऊन लपले. सगळे शोधताहेत कुठे गेले कुठे गेले
. हे आपले सुरक्षित स्थान मजबूत करण्यात गुंतले. त्यांनी स्वत:चे पर्वत
होऊ दिले. मोठ मोठे पर्वत होऊन ते देशा समोर गेले. देशानेही ते सहज
स्वीकारले . पण नेमकं काय घडत आहे हे कुणालाही कळत नव्हत . ह्या
सगळ्यामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचा वारसा आणि धम्म सभ्यतेचा आदर्श निर्माण
केल्या गेला नाही.तसे पाहता ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचीही जबाबदारी
होती पी.ई.सोसायटीने किमान महाराष्ट्रात तरी प्रत्येक जिल्ह्यात शाखा
स्थापन करायला हवी होती . पी.ई. सोसायटीने स्वतःचा विस्तार का केला नाही?
शाळा ,कॉलेजेस,महाविद्यालये का स्थापन केली नाहीत? पी.ई. सोसायटी समोर
विस्तार भयाची अशी कोणती कारणे होती? सरकार समोर त्यांनी आपले गाऱ्हाणे
मांडले का? विस्तारीकरणासाठी त्यांनी सरकारसमोर प्रस्ताव ठेवले का? आणि
जर हे कम्युनिकेशन झाले नसेल तर त्याची कारणे काय आहेत ? या कारणांचा
तिसऱ्या पिढीने शोध घेतला का? बौद्ध अल्पसंख्यांकाच्या पूर्व प्राथमिक
शिक्षणासाठी काय प्रयत्न केले गेले ? 'पाली'च्या संवर्धनासाठी काही विशेस
प्रयत्न का करण्यात आले नाही ? 'पाली'च्या संवर्धनासाठी पूर्व प्राथमिक
स्तरावर पाठशाला काढल्यास सरकार त्याला अनुदान आणि मानधन देते . हे
अजूनही कुणाला माहीतच नाही का? या माहितीचा प्रचार तिसऱ्या पिढीने केला
असता तर आज जागोजागी 'पाली' पाठशाला दिसल्या असत्या . पण हा समाज मुळातच
अंधार प्रिय आहे . ते अंधार पितात आणि अंधारच जगतात . त्यांना प्रकाशाची
जाणीव करून देणारा आणखी एक बाबासाहेब हवा आहे. ते सतत कुणाकडे तरी आशेने
पाहत असतात . पण दुसऱ्यांना एवढ रिकामपण कुठून येईल . हे अजूनही
अविद्येने ग्रस्त आहेत . विद्येविना वित्त नसल्याने ते अधिकच भयग्रस्त
झाले आहेत. मुलांना साधा इन्जिनिअरिन्गला प्रवेश घ्यायचा असला तर बाप
हवालदिल होतो.प्रवेश मिळू शकत नाही. एखाद दुसऱ्या गुणाने गव्हर्नमेट चा
प्रवेश हुकतो . प्रायव्हेट मध्ये करू शकत नाही .तितकी दानत नाही . मुलगा
मग बी.ए. करतो. सोबतच कुठे कुठे फॉर्म भरने सुरु असते.कुठलीशी नोकरी
मिळते ती स्वीकारतो . काय करणार . तो आता काय करण्याच्या मनस्थितीत आहे.
संध्याकाळी देशीचा क्वार्टर मारणे . आणि रविवारी तीन पाव मटण . संपल ...
आणि अश्यातच चौथ्या पिढीचा उदय झाला.
चौथ्या पिढीने तिसऱ्या पिढीला काय मागावे? तिसऱ्या पिढीजवळ देण्यासारखे
काय आहे? तिसऱ्या पिढीच्या या अक्षम्य दुर्लक्षाचे विरूपण करण्यात चौथी
पिढी मश्गुल होणार नाही. असे एकंदर चित्र दिसते आहे. चौथ्या पिढीला बुद्ध
- बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाची विलक्षण तहान लागलेली आहे. ही तहान
तिसऱ्या पिढीकडून भागवणे ही पारंपारिक पद्धती तिसऱ्या पिढीने स्वतःहून
बंद केली आहे . पण चौथी पिढी त्यांना वळसा मारून बुद्ध - बाबासाहेबां
पर्यंत थेट जाईल . कारण -
वारूळ
कितीही खोदा
ते
वर येतच
आतला
किडाच तसा प्रभावी असतो
*****************
धम्मप्रभाव
धम्मस्वीकार प्रसंगाला धर्मांतर असे संबोधले जाते. एकोणविसशे चौर्यांशी
-पंच्यांशी मध्ये मूल्यांतर असे आपण सार्थपणे म्हणू लागलो. मूल्यांतर हेच
अपेक्षित धारण क्षेत्र होते. मात्र हे मूल्यांतर घडले का ?
मूल्यान्तराच्या अस्वीकाराने जी अपरिमित हानी झाली. ती झालीच...ती जरी
भरून न काढता येणारी असली तरी नवे पर्याय,हमरस्ते,दिशादिग्दर्शन समोर
येतांना दिसते. "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जी जीवनदृष्टी आहे, तीच आमचीही
जीवन दृष्टी आहे " असे अकोला येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
पदावरून बोलतांना डॉ.वसंत शेंडे म्हणतात. हे विधान अंगावर शहारे आणते.
बाबासाहेबांच्या आणि आपल्या जीवनदृष्टीचा एकात्म सहसंबंध प्रक्षेपीत
होतांना पाहता येतो.मन भरून येते. आपल्याकडेही जबाबदारी च्या भावनेने
पहिल्या जाऊ शकते!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे.
बुद्ध धम्म आपल्या हातात दिला. बुद्ध धम्मात हवं तसं वावरण्याच
स्वातंत्र्य दिल. आता आपण कुणावर अवलंबून नाहीत. इतर धर्मियांना
पुरोहितावर विविध संस्कारासाठी अवलंबून राहावे लागते. बुद्ध धम्मीय हे
स्वताचे संस्कार स्वतःच करू शकतात. धार्मिक जोखडातून मुक्त होण्याचाच हा
मार्ग आहे. नैसर्गिक मानवा प्रमाणे जगण्याचा हा मार्ग आहे. हा मार्ग
प्रशस्त करणे, हीच मानवता. त्यासाठी धम्मप्रभाव जनमानसात खोलवर
प्रतिबिंबीत झाला पाहिजे.धम्मप्रभाव क्षेत्रात सर्वांच स्वत्व एकच
असते.ज्यांना हे माहित असूनही जे स्वार्थांधतेपायी दुर्लक्ष करतात,
त्यांच सोडा.ते झोपल्याच सोंग घेत आहेत.मात्र ज्यांना माहिती नाही
त्यांना माहिती करून देणे ही ज्ञानवंतांचीच जबाबदारी आहे.हे कोणत्याही
एका समाजच कार्य नसून हे राष्ट्रकल्याणाच कार्य आहे.हेच मंगल आहे.मानवी
कल्याणाची ही धारणा आहे. सगळे एक असण्याची ही धारणा धम्मप्रभावानेच
वृद्धिंगत होईल. ही जबाबदारी बाबासाहेबांनी आंबेडकरी समुहावर सोपविली
आहे.
धम्मस्वीकारानंतर जी प्रागतिक लाट संचारली. ती बहूतेक पोटा-पाण्यासाठी
हात-पाय हलविणारी होती. रोजगार प्राप्तीच्या आशेत धडपडणारी होती.भौतिक
गरजांना प्राथम्य देत देत जीवावर नांगर फिरविणारी होती. आता त्यांच्या
मेंदूला हवं असणार खाद्य कार्पोरेट जगताशी नात सांगणार होत.या जगात
मानवाच्या जीवंत असण्याखेरीज काहीही सत्य नाही.असे मानणाऱ्या जगाशी होत.
हे नाते-संबंध टिकविणे अपरिहार्य होते. शेवटी जीवंत राहण्याचा प्रश्न
होता. तथाकथीत जगतातील अहंमन्य बॉसना पेलून ठेवणे. हे दिव्यच होते.
त्यांची जीवनशैली समजून घेता घेता अल्पांशाने ती अंगवळणीही पडू लागली.
कामावर असतांना त्यांच्या अंधश्रद्धामुलक सोपस्कारांना डोळ्याआड करता आले
नाही. दिसामासी काही अवैज्ञानिक बाबींकडे दुर्लक्ष करणे. सवयीचे झाले. हा
गाफील क्षण सावरता आला नाही. काळाचे फोफावले.
गाड्यांवर अवैज्ञानिक मंत्र , नामे आलीत; अवैज्ञानिक रिंगटोन्स मोबाईल
मध्ये शिरल्या. राजरोसपणे अवैज्ञानिक समारंभास हजेऱ्या झडू लागल्या.
अवैज्ञानिक अंगठ्या, माळा ,टोप्या , पादत्राणे,टिक्के , गंध, अभिवादने,
पोषाख , नाही नाही ते अंगात शिरलं. मोठी मंडळी आपल्या घरी येतील तेव्हा
त्यांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने ते घरातही शिरलं. मुलांच्या
नावांपासून तर घरांच्या आणि पुस्तकांच्या शीर्षकातही शिरवल. मोठ्या
मंडळीच्या अनामिक दहशतीखाली स्वतःचा प्रभाव आतल्या आत दबला. मूल्यांतर
स्वीकारामुळे जे जखमा झेलत आहेत ते तर आणखीही विदारक आहे.
कशाला बौद्ध झालात? असे खडसावणाऱ्यांपासून बौद्ध म्हणजे एक पंथ आहे असे
अकलेचे तारे तोडणाऱ्यां पर्यंत सर्वांनाच बुद्धधम्मीय उत्तरे देत आले
असल्याचे दिसते. स्वतःच्या सभ्यतेला धक्का लागू न देता या व्यवस्थेत
टिकणे आणि विश्व मानवाच्या माणुसकीसाठी धम्ममूल्यांची अविरत पेरणी करणे
यासाठी जे वाघाचं काळीज लागतं ते वाघिणीच्या दुधातूनच येवू शकत.हे
त्यांनी जाणले.स्वीकारले. नूतन सृष्टी निर्माणासाठी प्ररंभापासूनचे
काबाड-कष्ट हवे असतात. हेही ते जाणून आहेत. प्राप्त परिस्थितीच्या
नकारातच नवनिर्मितीच्या सृजनकुलाचे अंकूर अनुस्यूत असतात. हे त्यांना
निश्चित माहिती आहे. पाण्याच्या घोटापासून तर प्रवासाच्या साधनांपर्यंत
होणारी मुस्कटदाबी ते हसत स्वीकारतात. लढतात,स्वतःशी आणि व्यवस्थेशी.
आम्ही विज्ञानवादी मार्ग स्वीकारला आहे. राजरोसपणे . ताकाला जावून भांड
लपविण्याची आमची वृत्ती नाही.जे जगतो ते खुलेआम .ह्या स्वतंत्र विचारसरणी
मुळे कठोर संघर्ष करावा लागला. बोटचेपे धोरण स्वीकारणार्यांची चंगळ दिसत
होती.ते संघर्षातून प्राप्त वाट्यात वाटा घेण्यापुरतेच. उदार अंतकरणाने
त्यांचेवरही मायेची पाखर केली.हेही स्वीकारले.मोठे झालात ना; आणा मग !
ह्या काळात दोलायमान होण्याचे प्रसंग आलेत,पण मागे नाही हटले. उपाय
शोधला.म्हाताऱ्या - कोतार्यांच्या मनातून एक मूर्ती काढली.दुसरी
ठेवली.बुद्धाची.ते त्यात रममाण झाले. समजत नसल्या तरी पाली गाथांच
उच्चारण करू लागले.ही क्रांतीच होती. सुत्तपाठाने त्यांचे कंठरव उच्च
झाले. उच्चारणातली जात्याच असणारी स्पष्टता तर दृष्टीपथात आलीच.
विज्ञानवादी आचरणाकडे मार्गक्रमण कार्यान्वितही झाले. भलेही ते काही
अनाकलनीय बाबींमध्ये गुंतले.जसे- बाबासाहेबांची मूर्ती डावीकडे की
उजवीकडे, पिंपळाची पाने तीन,पाच की सात की त्याहून जास्त की नकोच,
परीत्राणाचा धागा तीन पदरी की पाच पदरी, कापड पांढरे की काषाय , कोरे
मडके की तांब्याचे फुलपात्र ,बुद्ध पूजा आधी की त्रिशरण पंचशील , भीम
स्तुती की भीम स्मरण, आधी वधूने हार घालायचा की वराने, मंगळसूत्र बांधणे
,घालणे ,परिधान करणे योग्य की अयोग्य,या आणि अशाच काही बाबींमध्ये
गुंतले. पण बुद्ध-बाबासाहेबांना नाही सोडले. आमचे स्वतंत्र विधी म्हणून
त्यांनी त्याचाच अनुनय केला. आपला धम्मप्रभाव ते पसरवित राहिले. यश-अपयश
लपंडाव करीत राहिलं. डगमगले नाहीत . माघारी नाही फिरले.(संदर्भ: मोहन
शिरसाट : माघारी नाही फिरलो)
त्यांच्यासाठी कुणीही काहीही केलं नाही. त्यांनी स्वतःच स्वतःच विश्व
उभारलंय . तरीही बौद्धांसाठी कुणाला काही करावसं वाटत असेल तर काही
उपक्रम सुचतात.- *बौद्धांना शाळा देवून त्यामध्ये पाली हा अनिवार्य विषय
इयत्ता आठवी पासून असावा. *पालीभाषा प्रचारासाठी नियुक्त
धम्मदेसकां(शिक्षक ) साठी प्रशिक्षण तरतूद. *बौद्धांना गृहनिर्माण
संस्थांसाठी कर्जे *बौद्धांच्या मुलांना उच्चशिक्षणाची संधी *बौद्धांना
व्यवसायांची संधी *बौद्धांचे सांख्यिकीय सर्वेक्षण करून त्यांचा आर्थिक
स्तर ठरविणे *बौद्धांच्या साक्षरतेचे सर्वेक्षण क रून पदवीधर
बेरोजगारांची संख्या निश्चित करणे *धम्म कार्य करणाऱ्या संघटनांचे
संहितीकरण *धम्म परिषदांची नोंद राज्यात एकाच ठिकाणी करणे *बौद्ध
पद्धतींनी झालेल्या विवाहांची नोंद *बौद्ध धम्मावरील निरनिराळ्या
भाषांतील पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांची नोंद *धम्म पुस्तके
वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित करण्यासाठी ट्रस्ट स्थापित करणे.
*नावादिक्षित बौद्धांसाठी कार्यशाळा.इत्यादि
शेवटी
देश म्हणजे देशातील माणसेच ना ...!
**
धम्म व्यवसाय
तथागतांनी आपल्या पहिल्या प्रवचनातून विशुद्धी मार्गाचा उपदेश केला.
विशुद्धी मार्ग म्हणजेच परम अष्टांगिक मार्ग. हा आठ अंगांचा मार्ग सांगत
असतांना पाचवा मार्ग आहे सम्यक आजिओ. काय आहे सम्यक आजिओ. सम्यक आजिओ
बद्दल बाबासाहेब सांगतात, " Every individual has to earn his
livelihood.But there are ways and ways of earning one^s livelihood.
Some are good.Bad ways are those which cause injury or injustice to
others. Good ways are those by which the individual earns his
livelihood without causing injury or injustice to others. this is
samma ajivo ." सम्यक आजीविके बद्दल बाबासाहेबांनी वारंवार हे प्रतिपादन
केलेले आहे. कुणाला दुखापत होणार नाही आणि कुणावर अन्याय होणार नाही असा
व्यवसाय करावा असे बाबासाहेब सांगतात . बौद्ध व्यक्तीने आपला व्यवसाय
निवडतांना ह्या गोष्टीच भान ठेवलं पाहिजे . बाबासाहेब हे बौद्ध
व्यक्तीच्याच संदर्भात का म्हणतात , हे समजून घेतले पाहिजे.बरे बौद्ध
व्यक्तीवरच का ही बंधने आहेत . असे म्हणतात की बौद्ध धम्म हा तर फारच
सोपा आहे.म्हणून सार जग बौद्ध धम्म स्वीकारत आहे.मग अशी बंधने पाहता
बौद्ध धम्म सोपा आहे का ?
का म्हटलं असेल बाबासाहेबांनी असं ! ह्याचा विचार करावाच लागेल. तथागताचा
हा विचार अधिक ठळक पणे बाबासाहेबांनी का मांडला असावा. ह्याचा विचार कुणी
करावा. व्यवसाय निवडतांना किती काळजीपूर्वक विचार करावा लागतो.इतरांच
सोडा.पण बौद्ध व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी आहे. कारण ते त्याच्या बौद्ध
असण्याच्या लक्षणांपैकी एक आहे. बौद्ध झाल्यामुळे व्यवसाय निवडतांनाही
जागरूक असले पाहिजे.बौद्ध धम्म स्वीकारतांना या बाबींचाही विचार केलेलाच
आहे. आपल्या जगण्यातच हे अनुस्यूत आहे.बौद्ध माणूस म्हटला की ह्या फार
मोठ मोठ्या अपेक्षांचे देणे त्याचेकडे असते.त्याची त्याने पूर्तता करायला
हवी. बौद्ध माणसाने व्यवसाय निवडतांना स्वतःच्याही आधी देशाचा विचार केला
पाहिजे. आपल्या व्यवसाय निवडल्याने देशाला कुठल्याही प्रकारचा त्रास
होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.किंवा देशाची नामुष्की होणार नाही ह्याची
काळजी घ्यावी. अन्यथा देशाची नामुष्की ह्या व्यक्तीमुळे झाली असे झाले तर
तो त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याला काळिमा फासला असे म्हणावे लागेल.
म्हणून व्यवसाय निवडतांना संपूर्ण होश-हवास मध्ये असावे. मग प्रश्न असा
येतो की,कोणता करावा व्यवसाय. खाटकाचा व्यवसाय करू नये . खाटकाच्या
व्यवसायात प्राण्यांना जीवानिशी मारावे लागते म्हणून खाटकाचा व्यवसाय करू
नये . एखाद्याचा पिढीजात व्यवसाय खाटकाचा असला आणि त्याने बौद्ध धम्म
स्वीकारला तर! तर त्याला आपला पिढीजात व्यवसाय त्यागावा लागेल. बौद्ध
असण्याची त्याची हीच तर अट आहे .पिढीजात व्यवसाय त्यागावा लागेल . बौद्ध
व्हायचे तर ते डेअरिंग असावे लागते. पिढीजात व्यवसायाचा त्याग केल्यानंतर
खरा संघर्ष समोर मारासारखा उभा ठाकतो.त्याच्याशी निकराने लढण, हाच असतो
पुरुषार्थ. हे असते जगणे. अथक प्रयत्न अर्थात निरंतर लढाई. ही लढाऊ लस
टोचून घेण म्हणजे बौद्ध होण.
एखाद्याला जीवानिशी मारणे तर दूरच पण त्याला दुखापतही होणार नाही अश्या
पद्धतीने व्यवसाय सांभाळावा लागेल. दुखापत त्याच्या शरीराला होऊ नये आणि
मनाला! त्यांच मनही बौद्ध माणसाने ओळखलं पाहिजे. आणि ते दुखावणार नाही
ह्याची काळजी घेतली पाहिजे. अश्या पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे. आम्ही
बौद्ध धम्म विधिवत स्वीकारला नाही म्हणून काय झाले , मात्र आम्ही आचरणाने
तर बौद्धाच आहोत असे म्हणणार्यांना काय म्हणावे . पण ज्यांनी विधिवत
बौद्ध धम्म स्वीकारला आहे. त्यांना मात्र ह्या नियमाच पालन करावच
लागेल.आणि कुणावर अन्याय होणार नाही ह्याचीही खबरदारी घ्यावी लागेल.बौद्ध
व्यक्तीने कुणावर अन्याय होऊ देता कामा नये. त्याने प्रत्येकाशी
न्यायानेच व्यवहार केला पाहिजे. तोच बौद्ध मार्ग आहे. बौद्ध व्यक्तीच्या
न्यायपूर्ण वागण्याने त्याचेसह राष्ट्राचा विकास साधणार आहे. कारण थेंबे
थेंबे तळे साचे. ह्या तळ्याच पाणी गोड,रुचकर आणि सर्वांच्या तृषा शांत
करणार आहे. म्हणून हे तळ विस्तारलं पाहिजे. त्याचं पाणी सर्वांना चाखता
आलं पाहिजे. म्हणून दिवसेंदिवस त्या तळ्यात पाण्याची भर घालता आली
पाहिजे. त्यासाठी नोकरी-व्यवसायांनी सर्वांना जगविले पाहिजे.पोटाची भूक
नाही भागली तरी चालेल पण स्वाभिमानाच जगण जगता यायला हवं. स्वाभिमानाच
जीवन जगणार्यांना पुढे व्हावेच लागते. लढे उभारावेच लागतात. त्यात काय.
ठेचा खाव्याच लागतात . त्यात काय.स्वाभिमानी लोकांच्या पाठीमागेच तर कळप
असतात.कळपचे कळप त्यांच अनुकरण करतात.पाहिजे तेव्हा ,हवे ते ,लाभ घेतात.
कळपांच्या खिजगणतीतही नसतात स्वाभिमानी लोक त्यात काय. म्हणून काही काळ
थांबत नसतो . तो अव्याहतपणे वाहत असतो, स्वतःच्या लयीत .अशा वेळी स्वतःच
स्वतःचे निर्णय घेण्याची आता सवय लावली पाहिजे. नोकरी-व्यवसाय कोणते
करावे हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आपणच आपल्याला उत्तरे दिली पाहिजेत.
व्यवसायाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कवी केतन पिंपळापुरे म्हणतात -
आपण अजून उभे केले नाहीत कॉन्व्हेंट्स, हॉस्पिटल्स
आपण अजून उभ्या केल्या नाहीत शाळा, कॉलेजेस
आपण अजून उभ्या केल्या नाहीत बँक्स , ब्लड बँक्स
इन्जिनिअरिन्ग कॉलेजेस , आयटी सेन्टर्स ,
कोऑपरेटीव्ह
सोसायट्या, कॉलनीज, लायब्ररीज, न्यूज पेपर्स
आपण अजून कुठे फॅक्ट्रीज आणि इंडस्ट्रीज उभारल्यात ?
आपण अजून उभारले नाहीत छापखाने, जिम्स,मिल्स
आपण कुठे मॉल्स , शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलेत?
आपण अजून केला नाही या हिरव्या हिरव्या माळांवर कब्जा
बघा आपण काय केलं आणि काय करायचं राहिलं. चिंतन केलं पाहिजे . चिंतन
करतांना -हे व्यवसाय बौद्ध लोकांनी करतांना सम्यक आजीवो ह्या अष्टांग
मार्गातील पाचव्या मार्गाच्या अधीन राहून करावे लागतील. हे आपल्यालाच
करावं लागेल. कारण हा देश आपला आहे. " माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब
असेपर्यंत मी देशासाठी लढेन ' असे म्हणणाऱ्या बाबासाहेबांचा हा देश आहे.
या बाबासाहेबांच्या देशात अनीतीने चालणारा व्यवसाय दंडनीय ठरला
पाहिजे.अनीतीने व्यवसाय करणारा आढळल्यास त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
नीतीने नोकरी -व्यवसाय करणे स्वागतार्ह ठरविले पाहिजे . त्यासाठी
कार्यशाळा चालविल्या पाहिजेत. नोकरी-व्यवसाय पूर्व कार्यशाळा मधून
धम्मनागरिक (dhammaripublicans) घडविले पाहिजेत. हा तर अजून प्रारंभही
झाला नाही.
**
धम्मकुटुंब
"प्रत्येकाने कुटुंबासह दर रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे..." हा बाबासाहेबांचा आदेश आहे. सारनाथला बाबासाहेबांनी हे आवाहन केलं होत.बाबासाहेबांच्या या आदेशानुसार वागणाऱ्या सामान्य कुटुंबाचे रुपांतर धम्मकुटुंबात होते.धम्मकुटुंबे महाराष्ट्रात किंवा सबंध भारतात किती(?) आहेत ह्याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. धम्मकुटुंब समाजाला तारणारे असले तरीही त्यांची नगण्य संख्या पाहता आणखी किती कालावधी हा समाज जागे होण्यासाठी घेणार आहे हा गहन प्रश्न आहे.
जी काही धम्मकुटुंबे आपल्या आजूबाजूला दिसतात ते एकत्रित येण्याचे काहीच प्रसंग दिसत नाहीत. किंवा त्या प्रकारचे प्रसंग निर्माण केले जात नाहीत.पर्यायाने मोठ्या कष्टाने असे म्हणावे लागते की धम्मकुटुंबाच्या बांधणीसाठी जोरकस प्रयत्न केले गेले नाहीत.
आपण कुटुंब संस्थेत राहतो. कुटुंबाच्या निकोप पर्यावरणासाठी झटतो. माझे कुटुंब सुखी असावे अशी आपली तळमळ असते. पण त्यासाठी नेमकं काय कराव? कसं वागावं? ह्याची शास्त्रशुद्ध मार्गदर्शिका आपल्याकडे उपलब्ध नसते. केवळ अंदाजाने आपण मार्गक्रमण करीत आहोत. किती दिवस अशी बेभरवश्याची जिंदगी आपण जगायची? आपल्याला कुठ जायचं हे आपण निश्चित का करू नये? पण आपण काय कराव हे आपल्याला घरी येऊन कुणीही सांगणार नाही हेही तितकेच खरे.त्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे.
प्रारंभीच्या काळात स्त्री ही कुटुंबप्रमुख होती.ती दररोज पंधरा कि.मी.चालायची,अन्न मिळवून गुहेतल्या आपल्या कुटुंबासाठी घेऊन यायची. वल्कले(झाडांची साल) नेसण्याचा तो काळ होता. अश्या प्रकारे पूर्वी पासूनच्या मानवी सभ्यतेचा विचार केला असता असे लक्षात येते की;मानवी कुटुंबे ही स्त्री प्रधान होती. स्त्रियांच्या आदेशाच पालन केल्या जाई.स्त्रियांच्या सूचनांना सन्मान दिल्या जाई. काळ सरकत गेला. कुठल्यातरी बेमुर्वत क्षणी स्त्रीची सत्ता ही पुरुषाने आपल्या हातात घेतली.इतकेच नव्हे तर त्याने स्त्रीला गुलामही केले.हा एकाने दुसऱ्याला गुलाम करण्याचा सिलसिला सुरूच राहिला.काळ सरकत गेला.आणि येणारे संस्कार स्वीकारतही गेला. खरे तर काळावर स्वारच व्हायचं असते. तो त्याला जसं घडवलं तसा घडतो.काळाच स्वतंत्र असं काही नसत .त्याला घडवणारे मानवी हात असतात. काळ घडवणारे हात काही सर्वसामान्य नसतात. युगे युगे आपल्या कपाळावर ज्याची मोहर काळ मिरवीत असतो ते हात महान असतात.बाबासाहेबांनी ह्या समाजाच बोट धरून ह्या समाजाला ह्या समजाप्रत आणले आहे.इतकेच नव्हे तर भारतीय राज्यघटनेनुसार बाबासाहेबांनी स्त्रियांना समान हक्क समर्पित केले. स्त्री जातीचा फार मोठा सन्मान बाबासाहेबांनी केला. खरे तर स्त्री जातीचे ऋण सबंध भारतीय पुरुषांनी फेडण्याचा हा प्रसंग आहे. तो प्रसंग हिंदू कोड बिलाद्वारे बाबासाहेबांनी भारतीयांच्या अंगणापर्यंत आणला होता. पण अविद्याग्रस्त जनांना तो ओळखता आला नाही. खरेच आहे की ' संधी जेव्हा तुमचे दार ठोठावते तेव्हा तुम्हाला ती दिसली पाहिजे..'अन्यथा वरती मागून घोडे दामटण्यातच सुख मानणारेही काही कमी नाहीत.
बाबासाहेब हे भविष्यकाळात उभे राहून वर्तमान काळाकडे पाहणारे होते.हा समाज मानसिक गुलाम असल्याने.ह्या गुलामीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्याच रान केलं. स्वतःच्या आयुष्याची पाच सहा वर्षेही त्यांनी ह्या समाजाला दान दिली. जर थोडाफार आराम त्यांना मिळाला असता तर ते एवढ्या लवकर गेले असते का? जाता जाताही त्यांनी ह्या समाजाला बौद्धधम्म दिला. का दिला? संपूर्ण विचारांती आणि अभ्यासानंतरच धम्म दिला आहे.हे काही या खोलीतून त्या खोलीत जाण्याईतक साध सरळ नाही आहे.वीस वर्षांच्या आंबेडकरी अभ्यासाचे ते सांस्कृतिक पर्यवसान आहे. जगभरातल्या थोर विचारवंतांना अवाक करणारा हा निर्णय आहे.आणि हा बुद्धाचाच मार्ग आहे.त्यानेच तो प्रशस्तही केला आहे. बुद्धाने तर पूर्वापार चालत आलेल्या मानवी मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठीच हा निसर्ग प्रवेश केला होता. मानवी स्वभावातली हिंस्त्रता त्यांनी समजून घेतली.त्याही काळी समाजामध्ये स्त्रियांना नगण्य स्थान होते.बुद्धाने या मानसिकतेला विरेचीत केले . स्त्रियांना आपल्या संघात पुरुषांच्या बरोबरीने स्थान देऊन स्त्रियांचे मानवी सभ्यतेतील महत्व अधोरेखित केले. काळ सरकत होता. स्त्रियांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करण्याने कुटुंबाची स्थिती नव्याने दृष्टोत्पत्तीत येत होती.
भारतीय समाजात आंबेडकरी कुटुंबामध्ये ही पद्धती मात्र पूर्वापार चालत आलेली दिसते.आंबेडकरी समाजातील कोणतही स्वकथन घेतलं तरी त्यातून ही वर्णने आलेली आढळतात. आंबेडकरी कुटुंबातील स्त्रियांना काम केल्याशिवाय गत्यंतरच नव्हते.कुटुंबासाठी भाकर टुकडा मिळवणे हा एक आदिम विचार त्यांच्या जगण्यातून अव्याहतपणे वाहतो. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष मान. अशोक बुरबुरे म्हणतात - माझ्या माय पुढे थिटे समदे देऊळ ,राउळ
तिच्या पायाच्या चिऱ्यात माह्य अजिंठा ,वेरूळ
हे आईच मंगलगाण गाणाऱ्या बुरबुरे सरांची मुलगी न्यूयॉर्क मध्ये असते.कोलंबिया विद्यापीठात जाते.बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची डोळाभरून पाहते. बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी उभी राहते. फोन वरून ती बुरबुरे सरांशी बोलते.कंठ दाटून आलेला आहे.शब्द फुटत नाहीत.बुरबुरे सर हलो हलो करून स्तब्ध होतात.शेजारीच त्यांची आई असते. आई विचारते " कोनाशी बोलत गा?"
"तुह्या नातीशी?"
"कुठी हाये ते; पुन्यात?"
"नाई , साता समुद्रापार अमेरिकेत "
"बापा बापा "
" मा , कोणामुळे झालं वं हे "
म्हातारी काहीच बोलत नाही. तिचे थरथरते हात जोडते. बाबासाहेबांचा फोटो दाखवते.सांगता सांगता बुरबुरे सरांच्या डोळ्यांना आसवांची धार लागते .गहिवरलेल्या अंतकरणाने बुरबुरे सरांना आम्ही मनाचा जयभीम करतो.
माझ्या नजरेतल हे एकमेव उदाहरण.हे धम्मकुटुंब आहे.इतर लोक काय करत आहेत. प्रश्नच आहे. हे लोक भीम नगरात राहतात . पण त्यांचं लक्ष दुसरीकडेच असते. दुसऱ्यांच अनुकरण करण्यात ते आपला वेळ व्यतीत करतात.कुठे काही मिळते का यात व्यस्त असतात. राजकारणात भाग घेतात.खिशात कवडीही नसते आणि राजकारण करतात. किंबहूना काही मिळेल या आशेने राजकारणाभोवती घिरट्या घालतात. त्या घिरट्या सर्ववेळी वांझ ठरतात.हातात आजवरही काहीही आलेलं नाही.अशातच मुलांची संख्या एकावरून दोन वर जाते.घर आहे तितकच असतं. मुलांनाही शेवटी तसेच करावे लागते. घरातच कुडाच्या भिंतीचा आडोसा केल्या जातो.भिंती आणि आडोसे वाढून वाढून किती वाढणार. मग ताण वाढतो. भांडणं वाढतात. भांडणाचं कारण एकच असते भूक! भूक अस्वस्थ करते. आपसूकच धम्मापासून दूर ओढते. आणि जीवंत कुटुंबांची वाताहत होते.माणूस माणूस राहत नाही. तो प्राणिज पातळीवर वावरतो.मांस बनतो. प्राणिज मानवाला कौटुंबिक माणूस बनविण्याचे सामर्थ्य धम्मात आहे, ते शोधले पाहिजे.हे वेळीच व्हायला हवे होते. पण त्यांनी राजकारण केले. सत्ता हाती आल्यावर हवे ते करू असे सांगत राहिले.
या बाबतीत डॉ.मा.प.थोरात यांचा अनुभव खूप काही सांगून जातो. एकदा अमरावती येथे मान्यवर कांशीरामजी निवडणुकीच्या प्रचार प्रसंगी की आणखी कशाच्यातरी निमित्ताने पण पक्षाच्या कामानिमित्तच आले होते. तेव्हा डॉ.साहेब त्यांना भेटायला गेले.चर्चा करता करता डॉ.साहेबांनी कांशीरामजी यांना विचारले," आप जिस दिशा में मुव्हमेंट ले जा रहे हो, ऊन प्रयासो से क्या बाबासाहाब के सपनो का आंबेडकरी समाज निर्माण हो पायेगा?" यावर विनम्र पणे कांशीरामजी उत्तरले " नही."सबंध आंबेडकरी चळवळीवर प्रकाश टाकून अंतर्मुख करायला सांगणारा हा संवाद आहे.ज्या वेळी जे व्हायला हव होत ते त्या वेळी झालं नाही.हे मान्यच करावं लागेल. आणि हेही सर्व विदित आहे की ; मान्यवर कांशीरामजी यांचा अंत्य संस्कार त्यांच्या इच्छेनुसार बौद्ध पद्धतीने करण्यात आला होता. यावरून हे स्पष्ट होते की बऱ्याच लोकांना बौद्ध धम्म प्रिय वाटतो पण कुठल्याश्या लाभापासून आपण दुरावल्या जाऊ.ह्या अभिलाषेने त्यांना धैर्य येत नाही.
आपण आपल्या कुटुंबातच सुखी राहू शकतो. म्हणून आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.असे सर्वांना वाटते. पण त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ का देता येत नाही. त्याचीच तर खरी आवश्यकता आहे.असे असूनही का बर लोक धम्मा प्रमाणे वागत नाहीत? माझं कुटुंब धम्म कुटुंब असे ठठासून का बरे सांगत नाहीत. हाच तर खरा प्रश्न आहे. प्रश्न संपणारे नाहीत. सकाळ पासून प्रश्नांचे डोंगर पायाला खेटून उभे ठाकतात. दिवसाचा व्यास वाढत जातो.दिवस संपता संपत नाही. रात्र उडाणटप्पू होऊन धुडगूस घालते. कोणत्या दिव्याच्या प्रकाशात कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करावा. कुठे आहे दिवा -कुठे आहे पुस्तक.
असे हताश होऊन चालणार नाही.सर्व वेळी सर्व प्रश्नांवर मार्ग उपलब्ध असतो. फक्त असे मार्ग निवडतांना धम्माचरण क्षणोक्षणी सोबत असले पाहिजे. धम्माचरणाकडे दुर्लक्ष झाल्याने फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल.
शिक्षकांची जबाबदारी
कोणताही शिक्षक हा सवयीने निसर्गाशी संवाद साधतो म्हणून तो मुलांशी
जवळिकीचे नाते निर्माण करू शकतो.तो त्याच्या कार्यपुर्तीचा भाग असतो.हे
सर्व विदित आहे.त्यांना,आपल्याला सगळ्याच जबाबदार्यांतून जावे लागनार आहे
हे माहिती असते.त्यांचा समाजाच्या अतीसंवेदनशील घटकांशी जवळचा संबंध
असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षकांसंबंधीच्या विविध बाबी वारंवार
उजळल्या जात असतात.समाजाला एक अंगभूत सवय असते, शिक्षकात स्वतःला
पाहण्याची. ते रास्तही असते. समाजाने शिक्षकांचे शिक्षकत्व मान्य करणे
जसे रास्त असते तसेच शिक्षकांनीही समाजाचे मूल्यमापन केले पाहिजे.जर असे
घडले नाही तर ते निसर्ग करेल.मानव समाज आणि शिक्षक यांना परस्परांचे
अभिन्नत्व रेखांकीत करण्याचा आणि आपली स्वतंत्र टिपणी देण्याचा अधिकार
हा नैसर्गिक असतो. हे शासनानेही नम्रपणे मान्य केले पाहिजे.
शिक्षक संघटना आपल्या विविध उपक्रमांद्वारे आपल्या या अधिकारांचे
जाज्ज्वल्य प्रकटन करतात. आणि सवंग राष्ट्र कार्यातून अंग काढून घेण्याचा
पवित्रा घेतांना दिसतात. असे जे चीत्र वारंवार उभे केले जाते ते सर्वथा
चूक आहे.शिक्षक संघटना आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत नाहीत तर
सदस्यांची जाणीवजागृती करीत जबाबदारीचे संप्रेषण करतांना दिसतात.
समाजाभिमुख होतांना दिसतात. हे अटळ सत्य आहे. ह्याची सर्व प्रथम
जाणीवपूर्वक नोंद करून घेतली पाहिजे.
वस्तुतः शिक्षक आणि शिक्षक संघटना ह्यांचे नाते हे भावनिक आणि सांघटिक
स्तरावर अपरिहार्य मजबूत असते. याच अपरिहार्यतेवर शैक्षणिक मानसिकतेचा
डोलारा उभा असतो.माध्यमांतून तो पायाभूतपणे मांडला गेला पाहिजे. अर्थात
त्यासाठी शिक्षक संघटनांनी जे ब्रीद अंगीकारलेले असते ते दुर्दम्य
इच्छाशक्तींनी युक्त असते, ह्याचे भान ठेवले पाहिजे. ते अखंड असते कारण
त्याच्या सभोवती समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुभावाच्या सकारात्मक
मंगलतेची झालर असते. कारण ज्या शिक्षकांमिळून हे संघटन झालेले असते तो
शिक्षक पेशाने नोकरदार असण्यापुर्वी ..तो ज्या नीतिमूल्यांचा संप्रेरक
असतो त्याचा अविर्भाव त्याच्या कार्यातून आणि त्याच्या जाहीरनाम्यातून
सतत प्रकटवत असतो . हे समाजाने विसरता कामा नये.
समाज आणि शिक्षकांचे नातेसंबंध निकोपतेकडून एकत्वाकडे नेतांना तांत्रिक
गतीविधीहून जास्त महत्वाचे असतात. म्हणूनच या नाते संबंधांद्वारे मानवी
समाजाचे अनन्यसाधारण महत्व, संघटनांद्वारे सामाजिक अभिसरणाला देण्यात आले
आहे. ही नाविन्याची ओढ आहे...! बदलत्या समाजमानसाला कवेत घेतांना
शिक्षकाने आपले शामळू शिक्षकत्व झटकून उभे राहावे. वैश्विक निर्णय आणि
विचारप्रक्रियेत आपला नागरिक म्हणून सहभाग असला पाहिजे असा आग्रही विचार
त्याने करावा. कोणत्याही साधनसंपत्तीच्या परिप्रेक्ष्यात आपले स्वत्व
जपावे. मूल्यांचा ऱ्हास होऊ देऊ नये.शिक्षकाने असे असावे ह्यासाठी शासन
आणि समाज उत्सूक असतो. मग शिक्षकांची जबाबदारीही त्याच तडफेने शासनाने
आणि समाजाने स्वीकारली पाहिजे ना.
हव्या तश्या समाजाची निर्मिती करणे हे प्रत्येक नागरिकाचे जन्मजात स्वप्न
असते. त्यासाठी तो जन्मभर झगडत असतो.आपल्या स्वप्नातील समाजाचे
मूर्तस्वरूप प्रकट होण्याचा आधीचे त्याचे वय शिक्षकाच्या हातात
असते.शिक्षक त्याच्या हळुवार भावनांना गोंजारतो.त्याचे विश्व त्याला
स्वतात विस्तारवू देतो. त्याच्या विश्वाचा एक भाग होतो. त्याला त्यात
हवे ते ते ओतायला मदतही करतो.आपलीही स्वप्नतृषा मुलांमधून भागविण्याचा
अल्पसा प्रयत्न करतो. पण या भासमान जगातून मूल जेव्हा बाहेर येते तेव्हा
त्याला त्याच्या शिक्षकाने रंगविलेल्या चित्रातले फोतरही दिसत
नाही.तेव्हा तो नागारिक आपल्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःपुरते जग बनवत जातो
आणि त्रिज्येने खालावत जातो.मंदभान होऊन नेमेची येतो पावसाळा या न्यायाने
जगू लागतो. या अवस्थेतून बाहेर पडल्यावर ज्यांना आपल्या पालकांमध्ये
शिक्षक दिसतात ते थोर होतात.हा त्याच्या जडण घडणीतला शिक्षकांचा सहभाग
जवळ जवळ ९० टक्के असतो. हे प्रत्येकालाच मान्य असेल.असे मला वाटते.
शिक्षकाच्या ह्या अतिसंवेदनशील महत्वाकडे सर्व क्षेत्रे केंद्रीत झाल्यास
समाजाचा चेहरा मोहरा बदलण्यास फारसा विलंब होणार नाही.मूल स्खलनशील वयात
असतांना, भावनिक आधारासाठी चाचपडत असतांना, स्वत:चे भासमान भावविश्व
रंगवत असतांना प्रत्येक वेळी शिक्षकाचे भव्यत्व त्याच्या समवेत असले
पाहिजे.त्याच्या देहा-मनावर आपल्या उदात्त खुणांचे आरोपण करीत असले
पाहिजे.....मात्र सद्यस्थितीत बिचार्या शिक्षकाची अवस्था पाहण्या सारखी
झालेली असते.ह्याची समोर उभ्या असणाऱ्या पालकाला जाणीव होण्या आधीच तो
त्यावर हास्याची पापणी ओढून घेतो. त्याला भौतिक सुविधा आणखी मिळाव्यात
असा विचारही पालकाच्या,शासनाच्या आणि समाजाच्या मनात उभा राहू नये?
पूर्वीचे शिक्षक चांगले होते असे वारंवार टोचू टोचून वर्तमान
शिक्षकांच्या प्रज्ञेकडे डोळेझाक करणे थांबविले पाहिजे.
शिक्षकांच्या प्रज्ञावंत प्रतिभेला दुर्लक्षीत केल्या जाण्याच्या
प्रयत्नांवर जरब बसविण्यासाठी संघटनाची आवश्यकता असते.संघटनांद्वारे हे
लक्षात आणून दिले जाईल की धार्मिक कर्मकांडावर नका करू खर्च ,शिक्षणावर
करा.पण शासन आणि समाज अजूनही भूतकाळातच वावरतांना दिसते. महात्मा
फुल्यांनी हंटर कमिशन समोर शिक्षणाची मांडलेली सक्ती, छ.शाहू महाराजांचे
आरक्षण, राज्य घटनेतील तरतुदी आणि विविध शैक्षणिक धोरणे यापैकी कोणतीही
बाब आपल्या समाजाने गंभीरपणे घेतलेली नाही.ही अत्यंत दु:खाची बाब
आहे.त्याचे दुष्परिणाम आपण दररोजच आजूबाजूला पाहतो. तरीही वैश्विक
खेड्यातील क्षणभंगुर प्रलोभनांकडे अभावितपणे ओढल्या जात आहोत. हा
धोक्याचा समय आहे. आपले स्वत्व भांडवलदारांकडून हिरावल्या जातेय या कडे
आपले लक्ष नाही .आपण कोणत्या धुंदीत आहोत ह्याचा शोध घेतला पाहिजे.
ही शोध प्रक्रिया कम्मवादातून विकसित करता येते. हे विकसन आपण आपलच केलं
पाहिजे. शिक्षकांनाही ते करू दिल पाहिजे.शिक्षकाकडून आणि शिक्षक
संघटनांकडून ज्या जबाबदारीचे अपेक्षास्तंभ आपण उभारतो त्या जबाबदारीच्या
प्रतिपूर्ती साठी शिक्षकांचे पालकत्व आपण स्वीकारतो का ? ह्याचा
पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ केवळ वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे
तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि देहाला श्रमाकडे नेणारे
शिक्षण असले पाहिजे” मानवी जीवनाच्या पूर्णत्वाकडे जाणे ह्यासाठी श्रम
.माणुसकी आणि सत्यतेचा स्वीकार करणारा मेंदू विकसीत करता आला
पाहिजे.त्याच्या विकासासाठी अहोरात्र झटले पहिजे. सुन्दोपसुंदीच्या
व्यवहारातून बाजूला सरून आपल्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे. आपल्या
निर्मळ चारित्र्याचे चढते आलेख जनमनपटलावर पुन्हा एकदा उमटवावे लागणार
आहेत. त्यासाठी शिक्षक-शिक्षक संघटना-शिक्षक
प्रतिष्ठाने-शासन-प्रशासन-नागरिक संस्था एक झाले पाहिजेत. बदलत्या आधुनिक
परीप्रेक्ष्याला असे सामोरे जायचे आहे.
शिक्षक स्वतःच्या परिमाणांचे व्यूहसंकुल उभारतो.त्याच्या मनोर्यांवरून
विद्यार्थी आणि समाजाच्या अवस्थान्तराकडे पाहतो आणि समाजाच्या
परिवर्तनाचा एक भाग होतो. त्या पासून त्याला कुणीही थांबवू शकणार नाही.
त्याला असेच होऊ द्या. त्याची ही जबाबदारी स्वीकारा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय ऐक्य
मानवाच्या प्रारंभिक विकास अवस्थेस अबोधावस्था म्हणूया.ही अवस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वत: धारण करीत होते.एकंदरीत आपण सारेच त्याच दिशेने जात असल्याचे त्यांचे निरिक्षण आहे. देशोदेशी निव्वळ भ्रमंती न करता प्रत्यक्ष शिक्षण घेतले. समाजाभ्यासात स्वत:ला गुंतविले. तनतमा बाळगीली नाही.
आश्चर्यांहून आश्चर्ये त्यांनी अनुभवले. जगात कुठेच नाही अशी जातीप्रथा फक्त माझ्याच देशात आहे.का? का म्हणून? अशा प्रश्नांनी त्यांना बेचैन केले....अखेर, हेच माझ्या देशाचं दु:ख आहे यावर त्यांनी शिक्कामोर्तब केल. कास्टस् इन इंडीया, अँनिहिलेशन अॉफ कास्टस् द्वारे या दु:खनिराकरणाचा प्रश्न ऐरणीवर आणला .पण बथ्थड राज्यकर्ते बधले नाहीत.प्रॉब्लेम्स अॉफ रुपीज लिहून त्यांनी राज्यकर्त्यांना हादरविले.आपली अर्थनीती कुचकामी असून आता आपण काढता पाय घ्यायला हवा असे त्यांना निश्चीत वाटू लागले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हे राष्ट्र एकसंघ व्हावे म्हणून प्रारंभापासूनच पायाभूत प्रयत्न केल्याचे लक्षात येते. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा राष्ट्र प्रगतीचा प्रारंभिक पवित्रा होता.या सत्याग्रहामुळे देशाचे नाव जगभर गेले. जगाचे डोळे भारताकडे वळल्यामुळे भारतियांना आपली रहन सहन सुधारणे भाग पडू लागले.पण सत्याग्रह करीत राहिल्याने फार काही सुधारणा होणे संभव होईल असे नाही असे वाटल्याने त्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला.इंग्रजीला प्राधान्य दिले.इंग्रजीमुळे सबंध भारत एकसंध होईल असे तत्कालीन सर्वच नेत्यांना वाटत होते म्हणून राज्यघटना देखील इंग्रजीतूनच लिहिन्यात आल्याचे दिसते.
आज भारतियांसमोर आणि एकंदरीत जगासमोर दहशतवादाचे फार मोठे आव्हान उभे असल्याचे जाणवते.आमचे कोण काय करू शकेल? अशी त्यांची धारणा आहे. दहशतवादी किंवा कट्टरतावादी विचारसरणीच्या समुहांना सुद्धा या मानवी समुहाचा चेहरा बदलवायचा आहे,ज्या प्रमाणे की मनवतावाद्यांना.... पण कट्टरतावादी हे विसरतात की प्लास्टिक सर्जरी ने प्राप्त झालेला चेहरा खरा नसतो. जर काही सुधारणा करावयाचीच असेल तर ती निसर्गोपचारानेच होईल आणि ती अस्सल असेल.अस्सल असण्यापासून रोखणे हा निव्वळ खोटेपणा आहे.जोवर तुम्ही खोटे वागत राहाल तोवर तुम्हाला सतत पीडा सहन करीत राहावे लागेल.
खोटेपणाचा कळस म्हणजे आपण वेगवेगळे आहोत असे सांगणे होय.निसर्गदत्त शरीरावर वेगवेगळे घाव घालणे व आपल्या ओळखी निश्चित करण्यासाठी शरीर विद्रूप करणे हा असत्य मार्ग होय.
माणूस आणि इतर प्राणी यांच्या मधे काही साम्य आणि काही भेद आहेत हे आपल्याला मान्य करावेच लागेल.पण नर आणि मादी या भेदांवरही जर आपण राजकारण करीत असू तर तो आपल्या खोटेपणाचा उच्चांक गिनीजबुक मध्ये नोंदविला पाहिजे. या खोटेपणातून जर का आपण अहंकेंद्री समाजरचनेचा पाया घालणार असणार तर हे आपले कृतकपणाचे कृत्य ठरल्यावाचून राहणार नाही.
हा अहंपणा कोठून येतो याचा शोध घेतांना लक्षात येते की तो भीतीतून उद्भवत असेल. कारण दूसरं काही निमित्त संभवत नाही.......याचा अर्थ असा की भयमुक्त झाल्याशिवाय समाजातून खोटेपणा जाणार नाही आणि सत्यतेच्या अंगभूत स्वीकाराशिवाय ऐक्य शक्य नाही. भारतीय ऐक्यासाठी झटणारांनी भयमुक्त समाजाच्या निर्मिती साठी झटले पाहिजे.
भारतीय संविधानात ते आले आहे. संविधाननिर्मितीकालात संविधानसभेत अनेक गणमान्य नेते तोंडाला येईल तसे बोलत होते. आता आपण स्वतंत्र आहोत आणि आपण मन मानेल तसे वागल्यास काय हरकत आहे! अशा प्रकारचे एकंदरीत त्यांचे मानस दिसते.पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते.त्यांना केवळ समाजाच नव्हे तर देशाचाही एकसंघपणा टिकवायचा होता.जगापुढे आदर्श ठेवायचा होता.आम्ही जर एकसंघ आहोत तर जग का एकसंघ राहणार नाही..?असा विचार प्रसृत केल्याने जागतिक विचारधारेवर सकारात्मक परिणाम पडल्याशिवाय राहणार नाही असे त्यांना वाटत असावे म्हणून त्यांनी तिथे गणमान्य नेत्यांची उथळ व्याख्याने कानावेगळी केली आणि मुस्लिम लीग चे सदस्य सभागृहात हजर झाल्याशिवाय संविधानसभेचे कामकाज सुरू करण्यात येऊ नये अशा भूमिकेचा पूरस्कार केला.
विद्यमान भारतीय रिपब्लिकन नेत्यांनी ही बाब लक्षात घेणे फार गरजेचे आहे.ऐक्य कालबाह्य झाले आहे असे म्हणन्याचे दिवस संपले आहेत. रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा एकसंघपणे केंद्रस्थानी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाचा खरेपणा सिद्ध होणार नाही,हे लक्षात घ्या.रिपब्लिकन पक्ष जर एक झाला तर देशासमोर आणि जगासमोर खरेपणाचा आदर्श तुम्ही द्याल.तुम्हीच एक नाही न् आम्हाला काय सांगता.असा सवाल जर जनतेने विचारला तर त्यात वावगे ते काय?
सर्वजण म्हणत आहेत आम्ही एक यायला तयार आहोत.कुणीतरी समोर व्हा. मग व्हायचं कुणी समोर! साहित्यिक विचारवंतांनी समोर व्हावं असं एक मत आहे.मग व्हावं ना त्यांनी..सगळे दुसर्यांना सांगत आहेत अशी असतांना परिस्थिति आहे. हा सारा खोटेपणा आहे.आता हेच सत्य आहे की रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुखपदी अस्सल आणि खऱ्या व्यक्तिमत्वाने आले पाहिजे.कुणाच्या मान्यतेची वाट त्याने पाहू नये.कुणाच्या सत्यासत्यतेची चिकित्सा करण्यात वेळ दवडू नये.बाबासाहेबांनीच सगळी चिकित्सा करून ठेवली आहे.आता आणखी चिकित्सेच्या भानगडीत कशाला पडता...??? आणि नेते व विचारवंत या दोहोंनाही कवेत घेणारा सशक्त पर्याय म्हणजे विद्यार्थी..!!
हा विद्यार्थी शाळा,महाविद्यालयात शिक्षण घेणारा नको. तो या सृष्टीच्या कैंपस मधे प्रयोग करणारा असावा. ...तो संगीतकार आंबेडकर, वक्ता आंबेडकर, लेखक आंबेडकर, कैलिग्राफर आंबेडकर,चित्रकार आंबेडकर,तरुण आंबेडकर,खेळाडू आंबेडकर, स्मार्ट आंबेडकर, व्यायामपटू आंबेडकर, वाचक आंबेडकर, रमाईवर प्रेम करणारा प्रीयकर आंबेडकर,मुलाचे हातपाय चेपून देणारा कुटुंबवत्सल आंबेडकर, सहकार्यांसमवेत आवडीने भोजन करणारा संघटक आंबेडकर आणि प्रसंगी बौद्धधम्म स्वीकारून आसमंत धम्ममय करणारा वैश्विक आंबेडकर असला पाहिजे.
बुद्धधम्मात निर्वाण हे ध्येय आहे.निर्वाण ही मानसावस्था आहे.ही अवस्था कशी आहे? ही अवस्था धारक कुणाचा द्वेष करीत नाही.या अवस्थेत मनात कोणताही पूर्वग्रह नसतो.
एखादे बालक आहे.ते विस्तवालाही भीत नाही.ते तुमच्या अंगावर खेळत आहे पण त्याला शरीर काय हेच माहिती नाही. ही अबोधावस्था म्हणजे निर्वाण होय.स्वतःच संरक्षण करता येणे आणि अबोधावस्था म्हणजे निर्वाण.
सार जग निर्वाणाकडे धाव घेत आहे आणि तुम्ही स्वत:ला श्रेष्ठ म्हणवून घेण्यात अजूनही गुंतला आहात, हा खोटेपणा आहे. हा मुसावादा [मिथ्यापण] काढून टाकण्यासाठीच बाबासाहेब अहोरात्र झटले.
भारतीय रिपब्लिकनांचे डोळे उघडोत आणि आणि ते एक होवोत हीच मंगल कामना..
**
ऑक्टोबर क्रांतीचे मौलिकत्व
जुन्या ,मनुष्यमात्राला हीन मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करणे आणि मानावताजन्य बुद्ध धम्माचा स्वीकार करणे ही मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातली प्रमुख घटना आहे.या घटनेने काय झाले , तर नव्या माणसाच्या समृद्ध मानसाचा अंगीकार आणि वैज्ञानिक वास्तवाचा विनाअट स्वीकार करण्याचे दैदिप्यमान भान जागे झाले. प्रसिद्धी माध्यमांद्वारे ते जगभरातल्या व्यक्ती आणि समूहाप्रत पोचले.
पृथ्वीवर मानवी समाजाचे साम्राज्य टिकून राहावे यासाठीची धडपड करणारा वर्ग निर्माण होत असलेला . प्रामुख्याने नव नव्या वैज्ञानिक वास्तवांचा स्वीकार करण्याचे कौशल्य आणि शक्ती मानवी मेंदूला ज्ञात होण्याची अपरिहार्यता मानणारा.त्यासाठीच्या गरजा अधोरेखीत करणारा. मानवी मेंदू स्वतंत्र असणे आणि त्याला आपल्यासारख्याच मानवी मेंदूंनाही मुक्ततेचा अधिकार असल्याचे मान्य असणे. ह्याला जोडूनच भ्रातृभाव आणि न्याय संकल्पनेचा उदय होऊ शकेल हे अध्याहृत असणे,गरजेचे असते असे मानणारा . प्रामुख्याने हेच लोक पृथ्वीचे मौलीकपण टिकवून ठेवतील असा विचार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात येतो.याच लोकांना गतीमान करण्यासाठी बाबासाहेब 1956 च्या ऑक्टोबर ला बुद्ध धम्माचा स्वीकार करतात. आपल्या ग्रहावरून निरनिराळ्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे अभिनंदन करणारे संदेश येतात. याची सर्व प्रथम नोंद घ्या.
बुद्ध धम्म स्वीकाराच्या चर्चा होऊ लागल्या. 1950 ते 1956 असा तो काळ.राज्य घटनेचा स्वीकार आणि बुद्ध धम्माचा स्वीकार असा तो काळ.पृथ्वीवरच्या अस्तित्वात असलेल्या तत्कालीन माध्यमांद्वारे जगभर या घटनेचे उमटलेले प्रतीसाद. आणि जगभरातल्या मानवी समूहांच्या पारंपरिक बंदिस्त मूल्यांना झुगारता येऊ शकेल.असे आत्मभान देणारे हे दोन्ही प्रसंग.जगभरात नाविन्याची ओढ निर्माण झालेली.त्याच्या स्वीकाराची अहमहमिका चाललेली .सगळीकडे हा विचार जाऊ लागला. आणि हेच तर लक्ष्य होते.... याच पार्श्वभूमीवर बुद्ध धम्माची सांख्यिकीय चर्चाही होऊ लागली.काळ सरकत गेला.हे नेमकेपणाने थोडक्यात सांगितले पाहिजे की जागतिक स्तरावर बौद्धांची संख्या 1910 साली 138064000 एवढी होती ही संख्या 2010 साली वाढली आणि ती 436258000 झाली. आज ती त्याहून जास्तच असेल. बाबासाहेबांच्या लक्ष्याकडे काळ सरकतोय...
भारतात नव्याने होत असणारे व्यापक बुद्धधम्म प्रवेश [उदा.उदित राज, संदीप उपरे]हे त्याचंच फलित आहे. मात्र कुणीही बुद्ध धम्म स्वीकारताना आत्मपरीक्षण केले पाहिजे. ठरविले पाहिजे की बुद्ध धम्माचा स्वीकार ही एक जोखीम आहे.हे लक्षात घेतले पाहिजे की आपण बुद्ध धम्म दोन कारणांसाठी स्वीकारीत आहोत.
1.आचारांच्या बदला साठी
2.विचारांच्या बदला साठी. हे निश्चित झाल्यानंतरच धम्मस्वीकार होतो तो दोन्ही ठिकाणी.देहिमनी...!
धम्म स्वीकारानंतर आपल्या वर्तन बदलाचे मूल्यमापन कोणत्या निकषांवर होईल याची माहिती आपल्याला असली पाहिजे.
भंतेजी होणे हाही एक मार्ग आहे.या अवस्थेत राहून अर्हत्व प्राप्ती मिळवायचीय. पण त्या आधी आपण अनागारीक होऊ शकतो.पण त्याच्याही आधी आपण उपासक आहोत का याचा उलगडा आपण स्वतःचा स्वतःशीच केला पाहिजे. उपासकांसाठी आणि अनागारिकांसाठी धम्मसभ्यता आणि भंतेंसाठी धम्मविनय असे शब्द प्रयोग प्रचलीत केले पाहिजेत.
डॉ. बाबासाहेबांना या संदर्भात काय अपेक्षीत होते याचा आपण वारंवार धांडोळा घेतो का? बुद्धधम्माच्या संदर्भात बाबसाहेबांचाच विचार का करण्यात येतो? बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हटले गेले? बोधिसत्व आपोआप होतो का? बोधिसत्व कोणत्या पात्रता धारण करतात? धम्मसभ्यता आणि धम्मविनय या दोन्ही अनुषंगाने याचा माग काढला गेला पाहिजे.याच विचारस्त्रोतातून हा प्रतल उद्गमीत झाला आहे. डॉ. मा. प.थोरातां व्यतिरिक्त अन्य कुणी या अंगाने विचार मांडल्याचे माझ्यातरी वाचनात नाही.
बुद्ध होण्यासाठी त्याला दहा कष्टसाध्य अवस्थांमधून जावे लागते. त्यातली सातवी अवस्था दूरंङ्गमा …..!ही अवस्था बाबासाहेब फार जवळून जाणत होते. या बाबत आपण खोलवर मांडणी कधी करणार? बाबासाहेब हे आमच्यासाठी सर्वकाही आहेत.असे म्हटले आणि सगळे काही बाबसाहेबांवर टाकून मोकळे झाले .ही स्वछंदी वृत्ती त्यागली पाहिजे.त्याशिवाय बाबासाहेब कळणार नाहीत.बाबासाहेबांना आपण बाबासाहेब का म्हणतो हे कळल्याशिवाय त्यांना बाबासाहेब म्हणता येणार नाही.
बाबासाहेबांनी आपल्याला फार महत्तम जागतिक सभ्यतेशी जोडून दिले आहे. जगभर बौद्धांची संख्या अभिमान वाटावा अशी आहे. खंड निहाय बौद्धांची संख्या सांगतांना
आशिया -११.९%
उ.अमेरिका -११.१%
युरोप-०.२%
मध्य पूर्वोत्तर आफ्रिका -०.१%
लॅटिन अमेरिका कारिबिन-०.१%
अशी माहिती उपलब्ध होते. बाबासाहेबांची अपल्याप्रत दूरदृष्टी लक्षात येते. आपण स्वतःला आता दलित न संबोधता बौद्ध संबोधले पाहिजे. आपल्या संबंधातल्या बातम्या जगात जातांना बौद्धांच्या म्हणून जायला हव्यात.
डॉ. वसंत शेंडे धम्म स्वीकार प्रसंगाला ऑक्टोबर क्रांती म्हणतात, त्यातली मूल्यात्मकता समजून घेतली पाहिजे.ऑक्टोबर क्रांतीच्या पूर्वीचे बौद्ध हे धम्माला धर्म संबोधीत होते.धार्मिकतेने पालन करीत होते. पूजा अर्चा करीत होते.ऑक्टोबर क्रांतीने या कर्मकांडाला छेद दिला. हा फार मोठा बदल होता. हा बदल मानवाच्या दैनंदिनीशी निगडीत होता म्हणून ऑक्टोबर क्रांतीने धर्मांतर झाले नाही तर मूल्यांतर झाले असे प्रा.सतेश्वर मोरे यांनी म्हटले आहे. पुढे जाऊन असे म्हणता येते की ऑक्टोबर क्रांतीची ही देणं आहे की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी.दरेकाने दरेकाला दीक्षा देणे खोलवर समजून घेतले पाहिजे.
दूरङमा अवस्थे विषयी बाबासाहेब सविस्तर लिहितात. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात हे विवेचन आहे. इतर अवस्थांविषयी थोडक्यात लिहिले.दुरङमा विषयी भरगच्च दोन परिच्छेद लिहिलेले आहेत.हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.दूरङमा विषयी इंटरनेट वर विपूल माहिती उपलब्ध आहे.त्याचाही आपण अभ्यास करावा. बोधिसत्वाचं वर्णन करतांना बाबासाहेब म्हणतात.In his seventh life.He goes beyond time and space. ही अवस्था धारण करणारे सत्व दूरङमा अवस्थेत असतो. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला ही अवस्था आपण ताडून पहा. आणि नंतरच बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे वळले पाहिजे.
।मनो पुब्बङमो धम्मा मनो सेट्ठा मनोमया । असे एक आणि आणि मानवी मन एका क्षणात ८९ पाळ्या बदलते. हे अभिधम्म पिटका अंतर्गत झालेले संशोधनांचे संकलन.या दोन्ही पातळ्या आपण अभ्यासार्थ घ्यायच्या आहेत.या जाणीव पातळ्यांच्या सखोल अभ्यासातूनच मानवी उत्क्रांतीच्या आकलनाचा प्रारंभ होईल.
अन्न, वस्त्र ,निवारा ह्या गरजांइतकीच मानवाला संरक्षणाचीही गरज असते. हे सर्व प्रथम बाबसाहेबांनीच ऑक्टोबर क्रांतीतून दृष्टीगम्य केले आहे.आपल्या माणूस असण्याचे हे संरक्षण.बाकी काही नाही. आम्ही माणूस असून आम्हाला माणूस म्हणवून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.इतर मानवांसारखे आमच्याकडेही पाहिले जावे. तोच सामाजिक दर्जा आम्हाला मिळावा हा आग्रह आहे.या आग्रहाचे संरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे. या मूलभूत अधिकाराचे संसूचन संबंध मानवीजातीच्या मनपटलावर उमटवीने हे ऑक्टोबर क्रांतीचे लक्ष्य आहे.या वेळी बाबासाहेबांनी बौद्धांशी, बौद्ध राष्ट्रांशी संवाद माध्यम स्वीकारून अखिल मानव जातीला हा परामर्ष स्रोत उपलब्ध करून दिला आहे की। "मनुष्यमात्राला हीन मान मानणाऱ्याचा ....त्याग."ज्या व्यापक माध्यमपटलावर त्याग करण्याचे धैर्य बाबासाहेब दाखवतात तो विकत घेतलेला नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतासारख्या परम पावन मंगल भूमीचा तो सर्वोच्च मानबिंदू आहे. अशी क्रांती या आधी पृथ्वीतलावर कुणीही केलेली नाही. असे झालेले असल्यास दाखवून देणारा कुणीही नाही.हे अभिमानाने म्हटले पाहिजे.
ऑक्टोबर क्रांतीसाठी त्यांनी ज्या कार्यकर्त्यांचे सहकार्य घेतले तेही बदला साठी आसुसलेले होते .घरादाराची पर्वा न करता ते अविरत झगडत राहिले. नंतरच्या पिढीने त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे.हे भान ठेवून ज्यांनी आंबेडकरी चळवळीच्या खुणा जपून ठेवल्या ते धन्य होत.कार्यकर्त्यांचे दस्तऐवजीकरण त्यांनी केले.त्यात प्रा.प्रकाश जंजाळ , कारंजा यांनी बी. एस. इंगळे समवेत लिहिलेला अकोला जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास वंदनीय आहे.कारण हे सगळे ऑक्टोबर क्रांतीशी संबंधीत आहे. ऑक्टोबर क्रांती ही मानवी इतिहासातली एकमेव घटना आहे. ऑक्टोबर क्रांती नंतरची मानवी अवस्था अजून जन्माला यायची आहे.
सहस्रावधी वर्षातून अशा घटना घडतात.या नंतर काय घडेल हे सांगता यायचे नाही. पण जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.या विधानातील इतिहास न विसरणे या आशयसमुच्चयाशी राहून असे म्हणता येईल की; आपली शेपटी गळून पडली असे मानवाला कधी कळले असेल? आता आपण अंग झाकले पाहिजे असे मानवाला कधी कळले असेल? या कळण्याशी ऑक्टोबर क्रांतीचा सहसंबंध आहे.मानवी मेंदूतील ज्ञानकेंद्र उघडण्याशी त्याचा सहसंबंध आहे.आपण सहज वर्तमान काळाकडे नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की, ऑक्टोबर क्रांतीच्या नंतरची मानवी स्थित्यंतरे वैज्ञानिकते कडे जातांना दृतगती धारण करतात.
पर्वतारोहण, ऑलिम्पिक मधले विजय, राष्ट्रप्रमुखांच्या निवडी,परग्रहांशी संबंधीत मोहिमा, प्राथमिक आणि उच्च शिक्षणाकडे पाहण्याचा कल,पैशाकडे पाहण्याला होणारे कमी महत्व, ई. ज्या दिशेला मानवी समाज जातोय ती दिशा ही ऑक्टोबर क्रांतीची देण आहे.
ऑक्टोबर क्रांतीने जे तत्व पेरले ते प्रत्येकाला धारण करावेसे वाटले.ते स्वीकारताना त्यातले बुद्धरंग आमचे आहेत असे आपुलकीने मंडित केले.एकूण काय ,तर जे आमचे आहे तेच आम्ही स्वीकारीत आहोत अशी एक सार्थ जिगुत्सा प्रत्येकात ओतल्या गेली.
जातांना हे सांगितले पाहिजे की नव्याने बुद्धधम्म स्वीकारतांना तुमच्यातले आंबेडकरी स्वत्व प्रकटेल.त्रिशरण आणि पंचशील उच्चारतांना तुमच्या सर्वांगावर रोमांच उभे राहतील.तुमच्या सबंध देहाचा रोमाग्र पुलकीत झालेला असेल.लक्षात ठेवा हाच तो क्षण आहे.त्या रोमाग्रावर जी धारणा तुम्ही अंकीत कराल त्याचेच तुम्ही,तुमचे मन,तुमचा देह झालेले असेल .म्हणून सर्वाधिक गंभीरतेने हा प्रसंग ग्रहण करा.....
*
प्रभावी धम्मप्रचारासाठी
प्रत्येकाच्याच मनात एक आशा दडलेली असते. त्या आशा तृप्ततेसाठी धडपडत
असतो आपण.ती वैयक्तिक असते.किंवा सामुहिक असते.वैयक्तिक आशा जशा फलदुप
होण्यासाठी आपण कष्ट घेतो.तशाच सामुहिक आशांच्या साकारासाठीही सामुहिक
कष्ट हवे असतात.हे एकट्यादुकट्याचे काम नसते.एकट्याने समूहासाठी कष्टावे
आणि यशस्वी व्हावे ...असे दिवस संपले आहेत. आता सर्वांना यशस्वी व्हायचे
असेल तर सर्वांनीच कष्टले पाहिजे.
परिश्रम केल्याशिवाय आता थांबता येणार नाही. आंबेडकरी समूहाच्या हे
अजूनही लक्षात आलेले दिसत नाही.धम्मप्रचारकांच्याही हे लक्षात आलेले दिसत
नाही.धम्मप्रचारासाठी पुढे आलेल्या धम्मप्रचारकांनी ज्या यंत्रणा
उभारल्या त्याचे प्रभावी पर्यावसान प्रत्यक्षात उतरलेले दिसत नाही.हे असे
का घडले. सगळ काही पैशांनीच होते असे यांना वाटते. तसे पाहता पैशांनीच
सर्वकाही होईल असे नसते. वस्तुतः पैशाला काय किंमत आहे? आणि धम्मामध्ये
पैसा कुठे आला. भगवान बुद्धाने ऐश्वर्याचे स्वागतच केले आहे.पण प्रभावी
धम्मप्रचार करण्यासाठी तथागतांनी नेमका कशाचा वापर केला ही बाब कधी समजून
घेणार.धम्मप्रचार कुणाला करावा असे तथागतांनी सांगीतले आहे. तथागतांच्या
अनुयायांनी धम्मप्रचाराचासाठी तथागतांची वचने नऊ भागांत विभागली.या
विभागावर वर्गीकरणाने जनतेला जनतेच्या भाषेत आणि लोकांना कळेल अश्या
रुपांतरणाने धम्मप्रचार लोकाभिमुख झाला. अश्वघोषाच्या लालीत्यमय
स्पर्शाने तर धम्म मानवी चारीत्र्यातून ओठंगून गेला.ते नऊ विभाग -
१) सुत्त - बुद्धाचे संक्षिप्त वचने.
२)गेय्य - गाथा , यामध्ये गेय स्वरूपातील उपदेश आहेत
३) वेय्याकरण - व्याख्या , एखाद्या सुत्ताचा विस्तारपूर्वक अर्थ स्पष्ट करणे.
४)गाथा -धम्मपद , थेर गाथा आणि थेरी गाथा यांना गाथा म्हणतात . हे
वर्गीकरण बुद्धघोषाने केलेले आहे.
५)उदान - उस्फूर्त वाक्य , कवितेच्या किंवा वर्डस्वर्थ च्या भाषेत
स्पोनटेनिअस फ्लो
६)इतिवूत्तक - वृत्तांत , खुद्दक निकायांमध्ये १२४ इतिवूत्तक आहेत.
७) जातक - बुध्द जन्म कथा
८) अब्भुतधम्म -भ.बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांमध्ये असणाऱ्या असामान्य
क्षमतांचे वर्णन
९)वेदल्ल - वादविवाद, महावेदल्ल मध्ये महाकोत्ठीत आणि सारीपुत्त यांची
प्रश्नोत्तरे असून चुल्लवेदल्ल मध्ये आर्याजी धम्मदिना तथा त्यांचे
पूर्वाश्रमीचे पती यांची प्रश्नोतरे आहेत .
ह्या नऊ विभाग किंवा यातील काही विभाग किंवा एखादा विभाग समर्पनासाठी
स्वीकारून भिक्षूंनी धम्मप्रचार केला आहे.आधुनिक काळात ' बुद्ध आणि
त्यांचा धम्म ' या धम्म ग्रंथाबाबत विचारवंत उदासीन दिसतात .
वस्तुतः धम्मग्रंथाचे वाचन होतांना दिसत नाही. धम्मग्रंथावर चर्चा
होतांना दिसत नाही.धम्मग्रंथातील उताऱ्यांवर चित्रांचे प्रदर्शन
भरविल्याचे दिसत नाही. धम्मग्रंथातील प्रसंगावर नाटके बसवलेली दिसत
नाहीत.धम्मग्रंथातील प्रसंगावर गीत कार्यक्रम बसविल्याचे दिसत नाही.
धम्मग्रंथातील विषय विशेषावर परिसंवाद घेतल्याचे दिसत नाही. 'बुद्ध आणि
त्यांचा धम्म 'या धम्मग्रंथावर आधारित विचार संमेलने भरविल्याचे दिसत
नाही. धम्मकवी दिसत नाहीत. धम्मवक्ते दिसत नाहीत. बुध्द आणि त्यांचा धम्म
या धम्म ग्रंथावर टी.व्ही. वर मालिका दिसत नाहीत. या धम्मग्रंथावर आधारित
कथा लिहिणारे कथाकार नाहीत.धम्मग्रंथदिन कुठेही साजरा केल्याचे आढळून येत
नाही . बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचे सार म्हणजे हा धम्मग्रंथ आहे.
त्यामुळे जो बुध्द आणि त्यांचा धम्म या धम्म ग्रंथाला पाहतो तो
बाबासाहेबांना पाहतो. तोच बाबासाहेबांचा उत्तराधिकारी आहे . असे असतांना
आंबेडकरी समूहाचे लोक काय करत आहेत हेच कळत नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मग्रंथातून आपल्याला काय सांगीतले आहे. हे
अजून कळायचेच आहे. डॉ.मा.प.थोरात म्हणतात अजून आपल्याला बाबासाहेब
कळायचेच आहेत. बाबासाहेब दुरंगमा ही बुद्धत्वाची अवस्था कशी धारण करत
असतील याचा आपण कधी विचार करणार. बाबासाहेबांना कधी समजून घेणार.
अंगा-मनातून बाबासाहेब जेव्हा पूर्णतः व्यक्त होतील. तेव्हा कुठे नव्या
आयुष्याचा प्रारंभ होईल. तो पर्यंत काय खर नाही.
**
अर्थ पुरुषार्थ
चार प्रकारचे पुरुषार्थ तथागतांनी सांगीतले आहेत
. धम्म पुरुषार्थ [धम्मेच्छ],अर्थ पुरुषार्थ [अथ्थेच्च्छ] ,काम पुरुषार्थ
[कामेच्छ ] आणि मोक्ष पुरुषार्थ [मोक्खंच्छ].हे ते चार पुरुषार्थ होत.
यापैकी अर्थ पुरुषार्थ सर्वात जास्त महत्वाचा आहे.आजच्या युगाचा 'अर्थ'
हा अर्थ क्षेत्रातुनच जातो.
मी नुकताच सुप्रसिद्ध धम्माभ्यासक मध्यम शेगावकर गुरुजी यांच्या भेटीसाठी गेलो
.त्यांचं वय ८५ वर्षे आहे .मात्र आवाज खनखणीत आहे. ...तरुणाला लाजवेल
असा.खडा. धम्मचर्चे दरम्यान मी त्यांना विचारले ,
"
गुरुजी, धम्माचरणाने व्यक्तीला आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल का?" यावर
गुरुजी कसलाही गुंतागुंतीचा विचार न करता म्हणाले ," नाही."
मी अवाक झालो . बरेच जण या प्रश्नाचं 'होय' असं उत्तर देतात. हे उत्तर
देतांना ते स्पष्टीकरनही जोडतात .ते येणे प्रमाणे .... धम्माचरणी व्यक्ती
व्यसनांपासून अलिप्त असतात .याद्वारे ते आयुष्यातला भरपूर पैसा वाचवीत
असतात . साधी तंबाखूची पुडी जरी म्हटली तरी .. १ रुपयाची होते. दोन
दिवसातून १ पुडी खाणारा महिन्याला १५ रुपयांची तंबाखू खातो . या १५
रुपयात तो महिना भर पुरेल इतकं दंत मंजन घेऊ शकेल असं ते सांगत असतात .
त्याचं ते सांगण अप्रस्तूत आहे असं नाही. तंबाखू खाणारयालाही हे पटेल यात
वाद नाही . पण मध्यम गुरुजी सरळ सरळ ..नाही ..असं सांगतात आणि निक्षुन
सांगतात ...धम्माचरणाने व्यक्तीला आर्थिक सुबत्ता प्राप्त होणार नाही ...
चांगलं २,३ तास यावर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आलं . चार अरीय
सत्यांपैकी पाहिलं सत्य . काय आहे पहिलं सत्य . सर्वांना ते माहित आहे .
पहिलं सत्य आहे दुक्ख . दुक्ख हे पाहिलं सत्य आहे . नंतर येतात इतर सत्ये
. पण दुक्खाने अरीय सत्यांचा प्रारंभ होतो . याचा नेमका अर्थ काय ? याचा
अर्थ हाच आहे की दुक्ख अटळ आहे . काहीही केल्या दुक्ख माणसाला मरेपर्यंत
सोडत नाही. आता ते जर सोडतच नाही तर त्याच्या पासून पळून जाण्यात काय
अर्थ आहे? नाही का? आपल्या शरीराला एखादी जखम होते . ती जखम बसणे आवश्यक
असते . त्यासाठी त्या जखमेवर प्रेम केलं पाहिजे . तिला हवं ते दिल पाहिजे
. तीवर प्रेम केलं तरच तिला काय केलं म्हणजे ती लवकर बरी होईल हे
आपल्याला कळेल. तिचा द्वेष केलं.तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती चिघळेल .
तिचं मोठ भद होईल. त्यासाठी वेळीच उपाय योजना करायला हवी . म्हणजे 'मी
दुक्खी आहे हे खुल्या दिल्यानं सर्वप्रथम मान्य करायला हव. ' तो आपण
स्वतःवर प्रेम करतो याचा निर्देश आहे.
याचं धर्तीवर मध्यम गुरुजी म्हणतात
... धम्माचरणाने व्यक्तीला आर्थिक सुबत्ता प्राप्त होणार नाही ...मग
धम्माचरणाने काय होईल? हां धम्माचरणाने माणसाचा बौद्धिक विकास होईल
..त्याचा मानसिक विकास होईल ..पण आर्थिक तेचा याशी संबंध नाही . प्रश्न
आहे की बौद्धिक पातळीवर तो विकसित झाल्यावर त्याला धम्माची आवश्यकता काय?
पण हा प्रश्न वरवरचा आहे खोल विचार करतांना लक्षात येईल की, जगण्याच्या
प्रत्येक पातळी वर पंचशील आपल्या सोबतच असते. किंबहुना असे म्हणूयात की
पंचशील सोबत असेल तर एकेक पातळी युं युं चढता येते. पंचशील सोबत असेल तर
तुमचे चित्त स्थिर असते . अश्या वेळी शांत डोक्याने आपण निर्णय घेऊ शकते
. या द्वारे खूप मोठी बचत आपण करू शकू . पण तरीही अर्थोद्पादन हा
धम्मविषय नाही .
*
चारित्र्य संपन्नता
"पिपल्स एज्युकेशन सोसायटी ने महान पिढी घडविली . आजची पिढी हे त्यांचेच
पर्यवसान आहे .." ना.मु.कांबळे सद्गतीत होऊन सांगत होते.त्यांचा कंठ
दाटून आला. पण निकराने ते बोलत असतात.ना.मु.कांबळे एकोणविसशे अडुसष्ट
साली एम.कॉम.झालेले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज ,औरंगाबाद येथून.
पी.ई.सोसायटी चे उपकार त्यांनी काळजावर गोंदून ठेवलेले . सारे गोर
गरिबांचे मुल तिथं गोळा झालेले.शिक्षणासाठी . सोसायटी ने ही जबाबदारी
जाणीवपूर्वक पार पाडली . सरकार स्कॉलरशिप देणारच होती.पण कधी .......
वर्षाच्या शेवटी.तोपर्यंत खायचं काय? राहायचं कसं? साऱ्या प्रश्नाचं
उत्तर सोसायटी . पगारासारखे तीस रुपये सोसायटी महिन्याच्या महिन्या
द्यायची.पी.ई.सोसायटी म्हणजे या तमाम लुंग लुंगत्या जीवांची मायबाप
झाली.जबाबदारीच घेतली.पी.ई.सोसायटी ने नुकतेच बौद्ध धम्म स्वीकारलेल्या
नव तरुणांची पोटाची,ज्ञानाची आणि धम्माचरणाची भूक भागविली.मोठ मोठे
अधिकारी ,कलावंत ,साहित्यिक घडवले. चारित्र्य संपन्नता राखणे म्हणजे धम्म
हे सोसायटी ने रुजविले .
पुढे एकोणविसशे एकोणसत्तर साली त्यांनी "भीमवाणी" हे गीत पुस्तक
प्रकाशीत केलं . त्याला एस.टी. प्रधान यांची प्रस्तावना आहे .
पी.के.व्ही. मध्ये सहायक कुलसचिव म्हणून नोकरी करतांना ही धम्म कार्य आणि
साहित्य कार्य करीत राहिले.पुढे त्यांचे आणखी काव्य संग्रह आले.पण
त्यांचं धम्मकार्यातल सर्वात मोठ काम म्हणजे 'सुबोध धम्म प्रश्नोत्तरी '.
बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील प्रश्नोतर स्वरूपातलं हे
रुपांतर.बुध्द आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अधिक सरलतेने सामान्य जनांना
आकळावा हा उद्देश.सुबोध धम्म प्रश्नोतरी दोन हजार पाच मध्ये त्यांनी
प्रकाशित केला.आणि दोन हजार बारा मध्ये त्याची दुसरी आवृत्ती आली.
खरे तर कांबळे साहेबांप्रमाणे आपलंही सर्वांनी हा ग्रंथ वाचून समजून घेणे
आणि आपल्या जीवनात त्या प्रमाणे आचरण करणे आद्य कर्तव्य आहे. बुद्ध आणि
त्यांचा धम्म या ग्रंथावर विविधांगी चर्चा होणे आवश्यक आहे.आपल्या समग्र
साहित्यातून या ग्रंथाचे पडसाद यायला हवे आहेत.कारण तोच जीवन जगण्याचा
उत्तम मार्ग आहे . आज आपण सिव्हील एरिया मध्ये राहतो.तिथे अठरा पगड
जाती-धर्माचे लोक राहतात .त्यांच्या समवेत राहतो.अश्या वेळी ते लोक
आपल्यावर प्रभाव पाडू इच्छितात.मात्र आपण जर त्यांच्या प्रभावात आलो तर
संपलच सगळ.कारण विज्ञानवादी विचारसरणी आपण स्वीकारलेली आहे . म्हणजे धम्म
स्वीकारला आहे. हा मंगल विचार ताकदीने पुढे नेण्याची जबाबदारी
बाबासाहेबांनी आपल्यावरच टाकली आहे.बाबासाहेबांनी आपली निवड केली हाच
आपला फार मोठा सन्मान आहे. त्या द्वारे बाबासाहेबांनी आपल्याला विश्वाशी
जोडले आहे.म्हणजे आपला संबंध वैश्वीक मानवाशी आहे.त्यामुळे आपण प्रसंगी
तथाकथित स्थितीवाद्यांकडे डोळेझाक केली तरी हरकत नाही. दुसरे कशेही वागोत
आपण मात्र धम्माचरणानेच वागले पाहिजे आणि धम्माचरणाने वागून आपल्या
वागणुकीचा प्रभाव आपण आपल्या कृतीतून दाखवला पाहिजे.
बौद्ध धम्म हा स्व-कल्याणकारी असतांनाच मानवता ,समता,बंधुता,स्वातंत्र्य
व न्याय मिळावा आणि सर्व प्राणीमात्र सुखी व्हावेत अशी मनोकामना जनमनात
निर्माण करतो.मनातील वाईट विचारांचा ऱ्हास करून मन सर्वांच्या कल्याणाकडे
वळवितो .या जगात सर्वत्र शांती,मानवता,बंधुता,प्रेम,करुणा,कायम राहावी
आणि सर्वांचे कल्याण व्हावे अशी बौद्ध धम्माची धारणा आहे.या धारणेला धारण
करणे हे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्य आहे.तोच धम्म मार्ग आहे.
म्हणून प्रत्येकाने आपले चारित्र्य जपले पाहिजे.ते कसे जपावे हे शिकले
पाहिजे.त्याचं उदाहरण प्रजानंद उपर्वट यांच्या कवितेतून देता येतें “ जनी
मांगीण सांगत होती त्या आंध वाड्यातील कैनिले / माया भीमान माय मार्ग
दाखवला साऱ्या जगातील बहिनीईले/ या ठिकाणी बहिणीइले हा शब्द प्रयोग हेच
संदेश देत आहे. हे घरात राहून शिकता येणार नाही .त्यासाठी प्रचंड मेहनत
करावी लागते.त्यासाठी सामुहिक धम्मकार्यात सर्वांनी स्वतःहून सहभाग
घ्यायला पाहिजे . त्यामुळे समाजात एकमेकांचा आदर,बंधुभाव वाढेल.धम्माचे
आचरण वाढेल. आणि सर्व समाज एका सूत्रात बांधल्या जाईल त्यामुळे सामाजिक
एकता आणि एकात्मता मजबूत होईल.सामाजिक संघटन वाढल्यामुळे काही अंशी का
होईना -तात्पुरती तरी-सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक विकास होण्यास
मदत होईल.
हे सामाजिक दायित्व आजकाल कोणीही निभावतांना दिसत नाही.सगळे स्वतात
मश्गूल आहेत.संध्याकाळ झाली की मद्यपान हवे असते.त्या शिवाय त्यांना करमत
नाही.पिसाळल्यासारख होते. म्हणजे मानसिक रुग्णच. हे असे का घडते ? कारण
धम्माप्रती जागरुकता नाही. कुणालाच फारस कळत नाही.सगळ अज्ञान माजलं
आहे.मुख्य म्हणजे घरातच धम्म पालन नाही.कारण शिक्षण नाही . दहावी,बारावी
किंवा पदवीधर ह्यालाच ते शिक्षण समजतात.पदवीधराला काय किंमत आहे.हे काय
कुणाला सांगायला नको.हे तेवढ्यावरच कुदतात. खूप काही मिळवल्यासारखं
.गावभर शहर भर हिंडतात. कोणी स्तुती केली की हुरळून जातात . जगात काय
सुरु आहे ह्यांना काहीच माहिती नाही . तद्दन प्रतिभेचे लोक केवळ
संख्येच्या बळावर ह्यांना खेटून पुढे निघून जातात .हे त्यांच्याकडे
कसातरी चेहरा करून पाहत राहतात . काहीच करू शकत नाहीत.ही ह्यांची
मानसिकता आहे.आपण काहीच करू शकत नाही . कारण आपली संख्याच कमी आहे!
सरकारातही आपलं कोण आहे! आपण सर्वस्वी एकटे आहोत. ह्या आणि अश्याच
विचारांनी ते निराशाग्रस्त झालेले आहेत. धम्माचरणापासून दिवसेंदिवस दूर
जात आहेत. आणखी कुणीतरी मसीहा यावा आणि त्याने आपले कल्याण करावे .या
आशेवर ते आहेत.हे अज्ञान आहे.म्हणजे आजाराच. ह्या रुग्णावस्थेतून दुसर
कोणीच काढणार नाही.त्यांना स्वतःच त्यातून बाहेर पडाव लागेल.आपल्या पंधरा
ऑक्टोबर एकोणविसशे छप्पन च्या मुल्यांतरा प्रसंगीच्या संदेशात बाबासाहेब
म्हणतात, "..पण मी याबाबत एक महत्वाचा फरक करतो.रेडा,बैल व माणूस या
मध्ये फरक आहे .रेडा व बैल यांना रोज वैरण लागते .माणसासही अन्न
लागते.मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा व बैल यांना मन नाही; मनुष्याला
शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा.मनाचा विकास
झाला पाहिजे .मन सुसंस्कृत झाले पाहिजे ज्या देशातील लोक अन्नाशिवाय
माणसाचा माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर
लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही . जनतेशी संबंध ठेवतांना
माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही
सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता
येणार नाही...."
**
तथागताचे अदृश्य अनंत विज्ञान
. भ.बुद्धाचा हाच तर खरा शोध आहे ! तो आधुनिक विज्ञानाचा हुंकार
आहे.म्हणूनच महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी बुद्ध तत्वज्ञान हा
आधुनिक विज्ञानाचा हुंकार असल्याचे म्हटले आहे. आणि जगभर त्याचं हे विधान
सुपरिचित आहे .असे ते बुद्ध तत्वज्ञान आहे तरी कोणते ? म्हणजे ते ढोबळ
मानाने सांगण्या जोगे नाही का? की ते समजून घेण्यासाठी काही वेगळा प्रयास
करावा लागतो? उत्तर आहे नाही आणि होय.
महान कवी लोकनाथ यशवंत या बाबतीत माझ्याशी बोलतांना म्हणाले की जर ते
विज्ञान आहे तर अदृश्य कसे? त्यांचा प्रश्न हा कुणाही विचारवंतास
पडण्यासारखा आहे . फारच गुंतागुंतीचा विषय आहे का हा मला वाटते ते तसे
नाही .कारण तो माणसाच्या मानसाशी निगडीत असा विषय आहे.तो सविस्तर वाचायचा
असेल तरडॉ. मा.प. थोरात यांचा 'डॉ. आंबेडकर ,आधुनिक विज्ञान आणि मानव'
हा ग्रंथ उपलब्ध आहे . मी माझ्या स्तरावरही स्पष्टीकरण करू शकेन . कारण
काही प्रमाणात प्रत्येक जन अदृश्य अनंत विज्ञानाची अनुभूती घेत असतो
.मात्र असे असू शकते की त्यांना ते माहित नसते . लोकनाथ यशवंत यांनीच
आपल्या कवितेत म्हटले आहे की 'मी मावत नाही कुठल्याही कोनात, मी आहे एक
संपूर्ण वर्तुळ ' हे संपूर्ण वर्तुळ असणे हीच ती जाणीव होय .
हे सगळ जग माझ्याशी जोडलेलं आहे . मीही त्या जगाशी जोडलेला आहे . हे जग
माझं आहे . मी त्या जगाचा आहे. आम्हा दोघांमध्ये दुजा भाव नाही. आम्ही
एकच आहोत. ही जाणीव सर्व प्रथम बुद्धाने संशोधन करून मांडली .'केवट
सुत्ता' मध्ये तथागतांनी या बाबतीत विवेचन केलय. पुढे सातव्या शतकात 'आलय
विज्ञाना'मध्ये ही सगळी जाणीव मांडण्यात आली आहे. वसुबंधू आणि असंगाने ही
चर्चा विस्ताराने मांडली आहे ,असे डॉ.मा.प.थोरात सांगतात .म्हणजे अदृश्य
अनंत विज्ञान हे आपल्यासाठी घर आहे.मानवाने धर्म-वर्ण-वर्गात राहण्या
ऐवजी अदृश्य अनंत विज्ञानात राहावे. त्याचे चिंतन करावे . तेच तर खरे
जगणे आहे . मानवी जीवन त्यालाच म्हणता येईल . या अदृश्य अनंत विज्ञानाची
मांडणी करतांना प्रकाशाच्या तरंगाची संकल्पना त्यांनी पुढे आणली आहे .
प्रकाशाच्या तरंगाला सुद्धा जाणिवेच अंग आहे . तसेच अदृश्य अनंत
विज्ञानाला सुद्धा जाणिवेच अंग आहे . हे अदृश्य अनंत विज्ञान सगळ्या
सजीवांतून वाहते आहे. तेच वनस्पतीतून ही वाहते आहे . एवढेच नव्हे तर तेच
विज्ञान निर्जीव वस्तू मधूनही वाहते . पृथ्वीवरच्या प्रत्येक
अस्तित्वातून ते वाहते . वातावरणातून तर ते वाहतेच पण जिथे वातावरण नाही
तिथेही ते असतेच . पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत ते असते तसेच ते
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतही असते . एवढच नव्हे तर पृथ्वीच्या नि
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षांच्या मधातही ते असते. ते असते सूर्यातही
. आणि ते समुद्राच्या सखोलतेतूनही वाहत असते . सर्व आकाशगंगेत तेच हुंदडत
असते . आणि ते अव्याहत वाहते आहे. कधीही न थांबण्यासाठी .
हे न थांबण हाच बुद्ध धम्म आहे. हेच बुद्धत्व आहे. ह्या सम्यक दृष्टीच
विकसन होणे काळाची गरज आहे. ही सम्यक दृष्टी प्रत्येकात निर्माण होऊ शकेल
का? ह्या प्रश्नाचं तथागतांनी उत्तर दिलं ....... होय . प्रत्येकात सम्यक
दृष्टी निर्माण होऊ शकते . कसं आहे बघा.... सगळे लोक - अर्थात आपण सगळेच-
अंधारात चाचपडत असतात . हा अंधार आहे अज्ञानाचा . ज्याला सम्यक दृष्टी
प्राप्त झाली नाही तो हा अंधार आहे. हा अंधारही कसा आहे! अंधारकोठडीत
खितपत पडल्यामुळे जो अंधार आजूबाजूला आहे ना! तो हा अंधार होय . म्हणजे
डोळ्यात बोट घातलं तरी ते दिसू नये असा हा अंधार आहे. अश्या व्यक्तीला
देखील सम्यक दृष्टीचा प्रकाश लाभू शकतो. असे तथागत सांगतात .पण त्यासाठी
त्याच्या मनामध्ये थोडातरी प्रकाशाचा किरण निर्माण व्हायला हवा. ह्या
अंधाराच्या बाहेर कुठेतरी प्रकाश आहे . ह्याची जाणीव त्याच्यामध्ये
निर्माण व्हायला हवी. ही जाणीव जर त्याच्यात निर्माण झाली . तर तो
प्रकाशाचा शोध घेण्यासाठी धडपडेल. धडपडता धडपडता तो बलायू होईल आणि तो
स्वतःच त्या अंधारातून बाहेर पडेल. हा ह्या अंधारातून स्वतःलाच बाहेर
पडायचं आहे बर ! ह्या प्रसंगी तथागताने 'अत्त दिप भव' म्हटलेले आपणास
आठवत असेलच . बाबासाहेबांनी ह्या सगळ्या बाबींचा विचार करूनच हा ग्रंथ
आपल्याला दिला आहे . ह्याचे ह्या प्रसंगी भान ठेवावे .
बाबासाहेबांचा सगळा भर दृष्टीकोनावरच होता . शील त्यांनी आयुष्यभर जपले .
शीलाविना विद्या फुकाची असे ते म्हणायचे. तो त्यांचा दृष्टीकोनच होता. हा
विश्वव्यापी दृष्टीकोन मोठ मोठ्या विचारवंतांनाही साधता आला नाही. म्हणजे
बाबासाहेबांना अदृश्य अनंत विज्ञानाची समग्र जाणीव झाली होती. हे पुढील
विवेचनावरून स्पष्ट होईल.बघा , बाबासाहेबांनी बुद्धत्व प्राप्तीच्या ज्या
दहा पायऱ्या सांगितल्या आहेत , त्यातली सातवी पायरी फारच विस्ताराने
दिग्दर्शित केली आहे.हे लक्षात घ्या . सातवी पायरी कोणती आहे . सातवी
पायरी आहे "दुरङमा". ही सातवी पायरी प्रत्येकाने अभ्यासणे म्हणजेच अंधार
कोठडीतून बाहेर पडणे होय ..तोच मार्ग आहे . काय आहे या पायरी मध्ये
...बाबासाहेब सांगतात "In his seventh life the Bodhisatta becomes a
Durangama {going far off} . The Bodhisatta is now beyond time and and
space ;he is one with Infinity,but he still retains nama-rupa out of
his great compassion for all beings . He is secluded from others,in
that the lusts of the world no more cling to him than water to a lotus
leaf.He quenches desires in his fellow beings,practices
charity,patiens,tactfulness,energy,calmness,intelligence and the
highest wisdom.
While in his life he knows the dharma,but presents it in ways
understood by the people , he knows he must be tactful and patient .
Whatever men do to him he bears with equanimity, for he knows that it
is through ignorance they misunderstand his motives. At the same time
he never slackens his energy to benefit all beings, nor does he
withdraw his mind from wisdom , therefore misfortune can never turn
him from righteous path." आता तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडे गेलेला असतो
. आणि सर्वांच्या कल्याणासाठीची जी उर्जा त्याच्या मध्ये आहे ती तो जराही
क्षीण होऊ देत नाही. ही उर्जा सांभाळून ठेवणे. हाच तर आहे बुद्ध धम्म .
ही जनकल्याणकारी उर्जा तुमच्या - माझ्या मध्ये असतेच असते . तिचा शोध
घेता येतो . त्यासाठी अदृश्य अनंत विज्ञानाच्या घरात राहावं लागतं.
हा शोध घ्यायचा कसा? तो शोध स्वतःचा स्वतःलाच घ्यायचा असतो . तो सहजी
लागतं नाही . त्यासाठी हवा असतो निग्रह निकराचा .युगकवी केतन पिंपळापुरे
आपल्या निग्रह या कवितेत म्हणतात -
मृत्यूइतकेच असेल प्रिय मला
तुझ्या दिशेकडे पाठ फिरवणे
तुझ्या शब्दांशी द्रोह करून
विद्रोहाशी दगा करणे {मकाबी}
एकदा स्वीकारलेला मार्ग तसूभरही ढळणार नाही यासाठी निकराचा निग्रह जसा
हवा. तसाच जनकल्याणकारी उर्जा घेऊन जगण्याचा निधळेपणाही अंगात मुरलेला
असावा लागतो . मला परिणाम काहीही भोगावे लागले तरी मी माझ्या तत्वापासून
ढळणार नाही असा आंबेडकरी बाणाही हवा. हा बाणा मुरवत ठेवावा लागतो. आणि
असे करतांना तो आंबू द्यावा लागणार नाही .अश्या वेळी अदृश्य अनंत
विज्ञाना शिवाय पर्याय उरत नाही . सिद्धार्थाच्या वेळी .जेव्हा तो शाक्य
संघाचा सभासद होता . संथागाराचा सदस्य होता . तेव्हा संथागाराचे निलंबन
त्याने स्वीकारले पण रोहिणीच्या पाण्यावरून युद्ध करू नये या मतापासून तो
ढळला नाही.बुद्ध होण्यासाठी सिद्धार्थाच्या सत्वा सारखं सत्व पाहिजे. आणि
आपला जन्म बुद्ध होण्यासाठी धडपडला पाहिजे . प्रत्येकाचाच तो प्रयत्न
असतो.योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे हा त्याचाच भाग आहे . ह्या संदर्भात
अजातशत्रूचा प्रसंग आठवतो .
अजातशत्रूला शेजारच्या लीच्छविंना जिंकायचं होत. ते राज्य आपण जिंकू शकू
किंवा नाही या बाबतीत तो साशंक होता .म्हणून त्याने त्याचा प्रधान
वस्सकार याला तथागतांकडे पाठविलं . लिच्छवी लोकांवर स्वारी करणे योग्य
ठरेल का? असे विचारायला सांगीतले . वस्सकार तथागतांकडे गेला . तथागतांना
वंदन करून ,त्यांच्या डाव्या बाजूला बसला. त्याने सर्वप्रथम तथागतांच्या
तब्येतीची चौकशी केली.आणि अजाताशत्रूचा निरोप सांगितला .त्यावर तथागतांनी
डाव्या हाताची तर्जनी डाव्या मांडीवर रोवली . आणि पुढच्याच क्षणी ते
बोलायला लागले.... "वस्सकार अजातशत्रूला सांगा लीच्छविंना जिंकणे त्यालाच
काय पण कुणालाही शक्य होणार नाही......कुणालाही" त्यावर आश्चर्यचकित होऊन
वस्सकार म्हणाला ,"कुणालाही?"
'होय,कुणालाही"
'तथागत कृपाकरून याचं कारण सांगाल काय?"
"निश्चितच" तथागतच ते मानव जातीचे गुरु .कुणाला काय आणि कसं सांगावं याचं
अविरत भान त्यांच्यातून जागत असणार . तथागत सांगू लागले "वस्सकार
अजातशत्रूला जाऊन सांगा लीच्छविंना जिंकणे त्यालाच काय पण कुणालाही शक्य
होणार नाही, कारण लीच्छविंमध्ये सात सद्गुण आहेत . ते निट ऐक १. ते
एकत्रित येतात २.एकत्रित येऊन विचार करतात ३.एकत्रितपणे निर्णय घेतात
4.ते वृद्धांचा सन्मान राखतात 4.ते स्त्रियांचा सन्मान राखतात ५.ते
मिथ्या आचरण करीत नाहीत ६.ते कुणाला कमी लेखत नाहीत ७.ते परोपकारी आहेत
हे ते सात सद्गुण आहेत . जोपर्यंत त्यांच्यात हे सात सद्गुण आहेत तो
पर्यंत त्यांना कुणीही हरवू शकणार नाही " याचाच अर्थ असा की जे अदृश्य
अनंत विज्ञानाचे चिंतन करतात त्यांना पराजयाची भीती नसते. जय पराजयाची ते
चिंता करीत नाहीत . तत्व त्यांना प्राणप्रिय असते. चळवळ त्यांना महत्वाची
वाटते.सत्ता प्राप्त करावीही ती कशासाठी ..... तर दुक्खीतांच्या
-पीडितांच्या कल्याणासाठी . अश्याच लोकप्रतिनिधींना संसदेत पाठवायला हवे.
जे सर्वहारांचे प्रतिनिधित्व करतात. जे सर्वहारांचा घटक बनून राहतात . जे
अदृश्य अनंत विज्ञानाप्रमाणे आपलं आचरण ठेवतात.
राजकारणामध्ये जर अदृश्य अनंत विज्ञानाचे चिंतन करणारे लोक असले तर
कुठेही अन्याय-अत्याचार होणार नाहीत . साऱ्या आयुष्यभर आंबेडकरांनी हेच
तर केलं.आंबेडकरांच्या अवती - भवती कुठेही हिंसाचार घडून आल्याचे दिसत
नाही . उलट पक्षी दंगल सदृश्य परिस्थिती जर निर्माण होऊ पाहत असेल , तर
त्यांनी आधीच त्याची सूचना दिलेली आहे. ह्या सूचनेमुळे त्याचं
राष्ट्रातल्या लोकांवरच अतीव प्रेम दिसून येते. दंगल घडू पाहणाऱ्या
परिस्थितीतून ते हवा काढतात. त्यामुळे दंगल करू पाहणारे मेंदू
तृष्णामुक्त होतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे विरोधकांनाही
आंबेडकर हवे हवेसे वाटतात ते यामुळेच. आंबेडकरांचा वाद हा तात्त्विक वाद
. वैयक्तिक हेव्यादाव्याच गालबोट त्यांनी आयुष्यभर लागू दिल नाही. केवळ
पुस्तकांचाच अभ्यास केला नाही ,तर माणसे वाचली.एक एक माणूस जोडला. तो
काळजाच्या देठाशी टाचला . आज तळागाळातल्या जनामनात जी म्हणून काही
असतांना उर्जा आहे . ती आंबेडकरांचीच देण आहे . इथं असतांना असं म्हटल्या
शिवाय राहवत नाही .आणि ते खरेही आहे .
राजकारण आणि धम्म एक झाल्यास माणसा - माणसात दुरावा उत्पन्न होणार नाही.
शेवटी राजकारण हे सर्वांच्या हितासाठी कार्यरत व्हावं हीच तर तुमची-माझी
इच्छा आहे ना? ती ताकद आपल्याच तर हातात आहे . नंतर विचार करण्या ऐवजी
आधी विचार करून कार्य करणे आपल्या हातात असते. बऱ्याचदा असं होत की आपण
भूतकाळात असतो म्हणजे बहुतेक वेळा.किंवा भविष्य काळात असतो. वर्तमान काळ
शक्यतोवर आपल्या नजरेतच येत नाही. अर्थात भल्याभल्यांची ही अडचण
असते.कुणाला दिसते .कुणाला नाही दिसत. वर्तमान काळ स्वीकारणं . हे
क्षमतेच कार्य असते. ही क्षमता वृधिंगत करता येते का. आपल्या मनात जसा
भाव उत्पन्न झाला.तो आपल्याला ओळखता येतो का? आणि त्या नुसार स्वतःला
घडवता येते का ?
**
इज्जत, ताकद आणि शौर्य धम्मानेच हासील करता येईल.
धम्मात काय ताकद आहे? असे अनेकदा म्हटले जाते. तसे पाहता निसर्गाची ताकद
हीच धम्माची ताकद आहे. आणि निसर्ग तर कालातीत आहे. तथागत म्हणतात ,"माझा
कुणीही उत्तराधिकारी नाही. धम्म हाच माझा उत्तराधिकारी होय. जो मला पाहतो
तो धम्माला पाहतो.जो धम्माला पाहतो तो मला पाहतो." यावरून तथागातांमध्ये
जी ताकद आहे. तीच धम्मात आहे. किंवा धम्मात जी ताकद आहे ती तथागतांमध्ये
आहे. तथागत जर दशबल आहेत. तर धम्मही "दशबल तनुजं..." आहे.हे स्पष्ट
होते.आणि हृदयात खोल शिरते.
धम्माची ही निर्विवाद अपरिहार्यता मानवी जीवनाच्या कल्याणा साठीच तर
आहे.मानवी जीवनाचे कल्याण कशात आहे? माणसाला अन्नापेक्षाही इज्जत प्यारी
आहे ! इज्जत ही ताकदवान माणसा जवळच येते.लुंग्या- सुंग्यांच्या ती थारीही
थांबत नाही. ताकदवान आणि इज्जतवान माणसेच शौर्य गाजवू शकतात.हाच धम्म
आहे. तो पृथ्वीच्या बाहेरून आलेला नाही.तर मानवी व्यवहारातूनच तो
उत्क्रांत झाला आहे.मानवी स्वभावांच्या सखोल अभ्यासातूनच त्याचे निर्माण
झाले आहे. तो आधीही होता. तो या नंतरही असेनच. तो तथागतांनी संशोधित
केला. सर्वसामान्यांपर्यंत पोचाविला . बाबासाहेबांनी तोच निवडला. ही
धम्माची भाषा आहे. सबंध विश्वमानवाची जी संवेदनात्मक भाषा आहे,तीच
धम्माची भाषा आहे.तोच धम्म आहे.धम्माकडे क्षणभरही दुर्लक्ष झाले तरीही
अपरिमित हानी होऊ शकते. धम्माकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आंबेडकरी
समूहाची झालेली हानी पदोपदी दिसते आहे.आंबेडकरी समूहातील लोक स्वतःची
जबाबदारी नीटपणे पार पाडू शकले नाहीत.
आंबेडकरी समूहाच्या धम्माशिवाय च्या वर्तणुकीने आंबेडकरी समूहाची इज्जत
धुळीला मिळाली आहे. इज्जत गमावल्यामुळे त्यांच्याकडे ताकद उरली नाही.जी
काही उरली -सुरली ताकद आहे. ती स्वतःला सुरक्षित ठेवण्यात खर्च होत आहे.
पण हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. डोहात पडावे. नदीला पूर यावा. बाहेर
पडण्यासाठी हातपाय मारावे. तो तो क्षीण व्हावे. असा हा प्रयत्न आहे.
समूहाने सांगड घालून बुडणाऱ्या पर्यंत पोचणे हाच मार्ग असतो. तो सर्वांना
वाचविण्याचा मार्ग असतो. तो अंगीकारण्यासाठी बुडणारा माणूस हा माझा माणूस
आहे असे वाटले पाहिजे. त्यासाठी शूराच काळीज हव असते.
हे शूरत्व कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. ते समूहात घडते. ज्यांना
ज्यांना हे माहित आहे. ते ते लोक आपल्या सारखे शूर वीर निर्माण करू
शकतात. आंबेडकरी समूहाला हे चांगलेच ठावूक आहे. पण त्यांना शौर्याचा
रियाझ करण्यासाठी रणांगणच उपलब्ध नाही. रणांगण उपलब्ध करून देईल अशी
यंत्रणांची मानसिकता नाही. खरे तर देशाच्याही मानसिकते मध्ये अशा
प्रकारचे विचार बीजे पेरली पाहिजेत. पेरता आली पाहिजेत . देशाच्या आणि
मानवतेच्या दृष्टीने हे अग्र कम्म ठरावे. हीच काळाची हाक आहे. आंबेडकरी
समूहाने आता हा विचार केलाच पाहिजे. आंबेडकरी समूहाने आता पुढे टाकलेले
पाउल मागे घेण्यात काहीही मर्म उरले नाही. आंबेडकरी समूहाने आपल्यावरील
जबाबदारी आपल्याच खांद्यांवरून वाहून नेली पाहिजे. दुसरे काय करतात
त्याकडे लक्ष देऊ नये. दुसरे कसेही वागोत,आपण मात्र आपला बाणा सोडता कामा
नये.
देशानेही आंबेडकरी उर्जेचा वापर करून घेतला पाहिजे. आंबेडकरी लोकांना
वापरले पाहिजे.त्यांच्या कडून कामे करून घेतली पाहिजेत. अन्यथा ह्या फुकट
जाणाऱ्या उर्जेच्या भरपाई साठी नाहक नको तिथे परिभ्रमणे करावी लागतील.
आणि नदीला माय म्हणून संबोधतांना नाल्यांचे सावत्र भाऊ असे स्वतःला
म्हणवून घ्यावे लागेल. त्यात कुणाचा काय फायदा आहे? असे निष्कारण
विचारण्यात आता वेळ दवडू नये. आता भाला उचलावा अन चांदण्यात खस्सकन
खुपसावा.असा जमाना आला आहे.असे चांदण्याशी निर्घृणपणे जुगलबंदी करणारे
आंबेडकरी लोकच देश वाचवू शकतात हे अनेकार्थाने सिद्ध झाले आहे.
मग प्रशांत वंजारे यांच्या मताप्रमाणे संघटनाशिवाय हे होणे शक्य नाही.
ठीक आहे. डॉ. परम आनंद यांच्या मताप्रमाणे पंचशीलाप्रमाणे आचरण केल्याने
हे शक्य होईल.हे ही ठीक आहे. मात्र रघुनाथ अवचार म्हणतात की हे जग जसे
आहे तसे पाहता आले की ते शक्य होईल. प्रश्न आहे हे जग जसे आहे तसे पाहणे
शक्य आहे का? कुणाला ते साध्य झाले आहे का? ते कसे पहावे? ते पाहणे
म्हणजे काय करणे?ते पाहण्याची आस जागू शकते का? ती कशी जागवावी? त्या
नंतरचे जग कसे असेल? ते पाहणारे लोक आहेत का? कुठे आहेत ते? ते काय करतात
? अशी जाग निर्माण करण्यासाठी काय करावे? म्हणजे अशी जाग जागी झाल्यास
दहशत वादाचाही नायनाट करता येईल का? त्यासाठी आंबेडकरी लोक काय योगदान
देऊ शकतात ? शासनास ह्या विषयाची तीव्रता जाणवते का? ही जाग विकसित
करण्यासाठी शासन काही प्रयत्न करेल का?
खरे तर हे एखाद्या पहिलवाना सारखे कार्य आहे. पहिलवानाला जसा विशिष्ट
खुराक लागतो. तसा ह्याही लोकांचा काही खुराक असेल. तो खुराक त्यांना
मिळाला पाहिजे. मात्र असे कार्यकर्ते कार्य करतांना स्वतःचा शेंदूर होऊ
देणार नाहीत. या कडे डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. आंबेडकरी
कार्यकर्त्याची आयाडेंटीटी शासन दरबारी असली पाहिजे. तेव्हाच असली-नकली
अशी पहेचान करता येईल.
आंबेडकरी समूहाची गेलेली इज्जत,ताकत आणि शौर्य ह्याच अविकारी मार्गाने
प्राप्त होऊ शकेल. आंबेडकरी समूहाने आता सामुहिक स्तरावर झटले पाहिजे.
**
शिल्प संवर्धन
भारताचा सबंध प्राचीन इतिहास भारतीय शिल्पांमध्ये अंकित करण्यात आला आहे.
असे वारंवार सिद्ध झाले आहे.भारतीय सभ्यता हीच बुद्ध सभ्यता आहे.म्हणजेच
ती धम्मसभ्यता आहे. दुसरी कोणतीही सभ्यता नाही.हे ज्यांना कळले आहे त्यात
डॉ.परम आनंद हे एक आहेत.ते मुंबईला राहतात आणि लेणी बचाव आंदोलन
चालवतात.अकोला मध्ये महेंद्र शेगावकर हेच कार्य करीत आहेत .
हे खूप मोठ कार्य आहे.जागतिक दर्जाच कार्य आहे. कारण ह्या लेण्यांमधून
मानवी सभ्यतेचा इतिहासही दृष्टोत्पत्तीस येतो.हे जागतिक कार्य आहे . हे
महान कार्य माणसा-माणसात भ्रातृभाव निर्माण करणारे अग्रकार्य आहे.डॉ.परम
आनंद हे पी.एच.डी.आहेत.बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्यांनी आयुष्य झोकून
दिले आहे. ब्लिस ही संघटना त्यांनी स्थापन केली.मी स्वतः या संघटनेचा
सभासद आहे.परम आनंद यांच्याशी बोलण्याचा नुकताच प्रसंग आला. त्यांनी
उमदेपणाने सांगितलं 'प्रेमाचा मार्ग हाच बुद्धाचा मार्ग' साहित्या बाबतीत
त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले ,"आता संशोधनात्मक साहित्य निर्माण
होणे गरजेचे आहे" त्यांचे म्हणणे खरे वाटते. कारण त्या शिवाय शिल्पांचा
अर्थ लावता येणार नाही.आता गजलक्ष्मीचे उदाहरण घ्या. गजलक्ष्मी ही दुसरी
तिसरी कोणीही नसून ती महामाया आहे.सिद्धार्थची जन्मदाती. तिच्या स्वप्नात
आलेला पांढरा हत्ती.पुढे या हत्ती वरूनच ढोंगी आणि संधी साधू लोकांनी
तिला गजलक्ष्मी असे नाव दिले.शंकराची मूर्ती ही बुद्ध मूर्ती होय.घराघरात
पुजल्या जाणारी शंकराची पिंड. म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून ते स्तूप
आहेत.स्तुपांची प्रतिकृती आहे. स्तूप म्हणजे काय? ज्या वास्तूमध्ये भगवान
बुद्धाचे किंवा तेवढ्याच तोलामोलाच्या भिक्खुचे अवशेष (अस्थी ) असतात.
त्याला स्तूप म्हणतात. मनुष्य मरण पावला तरीही तो संपला नाही.त्याशी आपला
संबंध आहेच.असे मानणारे हे लोक होते. त्यांनी प्रीय व्यक्तींच्या अस्थी
अश्या जपून ठेवल्या.त्या भव्य स्तुपांची प्रतिकृती म्हणजे पिंड. घराघरात
ही पिंड दिसते.कधीकाळी भारत हा बौद्धमय होता याचं ते प्रतिक आहे.इथे
सम्राट अशोकाचा कालखंड अभिप्रेत आहे.सम्राट अशोकाने चौऱ्यांशी हजार स्तूप
आणि विहारे बांधली होती. तीच जगभर आहेत.सम्राट अशोकाची सत्ता जगभर
असल्याने त्याने धम्म प्रचारासाठी हे महान कार्य केले आहे.तो वेगळा विषय
आहे. त्याच स्तुपांच्या ह्या प्रतिकृती आहेत.सम्राटाने धम्मप्रसार
करतांना सामंजस्याची आणि प्रबोधनाची भूमिका घेतली आहे. म्हणूनच घरोघरी
ह्या प्रतिकृती दिसतात. लोकांनी मनापासून धम्म स्वीकारला होता.काही लोक
घरात शाळीग्राम ठेवतात .त्याची पूजा करतात . तेही पिंडेच अर्थात स्तुपाचच
प्रतिक असते.
तेच स्वस्तिक च्या चिन्हाच असते. त्याचीही पूजा केली जाते . वस्तुतः
स्वस्तिक हे बुद्ध चिन्ह आहे. स्वस्तिक च्या चार दांड्या म्हणजे चार आर्य
सत्ये . तर आणखी चार मिळून अष्टांगिक मार्ग होतो. ते लक्षात राहावं
म्हणून हे स्वस्तिक चिन्ह होय.ह्याला सबळ पुरावा आहे.निरनिराळ्या
शिल्पांजवळ ही चित्रे अंकित केली आहेत. डॉ.परम आनंद यांचे जवळ त्या
शिल्पांचे फोटोग्राफ्स आहेत.हे स्वस्तिक चिन्ह बळकावण्यासाठी संधीसाधूंनी
आजूबाजूला लाभ शूभ असे लिहिले. त्याचा बुद्धाशी निगडीत असणारा अर्थ दूर
नेण्याचा तो प्रयत्न होता. खरे तर सत्याचा तो अपलाप आहे.म्हणून किती दिवस
सत्य झाकून ठेवणार! एक दिवस ते उजागर होणारच आहे.
'
श्री' हे असे कुणाही व्यक्तीला आदरार्थी संबोधणारे संबोधन आहे. हे
संबोधनही बौद्ध सभ्यतेशी निगडीत आहे. परंतु ते श्री असे मुळात नाही
त्याचं मूळ रूप आहे सिरी. (सिरीपाद सरोरुहे) सिरी.हे संबोधनही
अशोककालापासून रूढ करण्यात आले. अशोकाने केलेले हे जाणीवपूर्वक बदल
होते.हे समजून घेतले पाहिजे.भारतामध्ये बौद्ध धम्म हा प्रमुख धम्म होता
.हे सर्वमान्य आहे. आता या लोकांना परत त्यांच्या स्व धम्माकडे वळवायचे
आहे.त्यासाठी ब्लिस प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लोकांची जी देवावर जी
श्रद्धा आहे ती काढावी लागेल.कारण देव या लोकांच्या मनात अगदी खोल रुतून
बसला आहे . तो काढावा लागेल. तो काढतांना कौशल्यपूर्ण वागणूक ठेवावी
लागेल. कारण देव काढला तर.त्या ठिकाणी काहीतरी ठेवावेच लागेल. त्या
ठिकाणी निसर्ग ठेवता येईल. बाबासाहेबांनी सांगीतले की त्या ठिकाणी नीती
ठेवली पाहिजे. मनतलाशी जर नीती ठेवता आली तर ते खरे मानवी जगणे आणि तोच
खरा बुद्ध धम्म .
नीतीनेवागणे हा मानवी सभ्यतेचा प्रारंभ आहे.मुंबई नगर रचना विभागात काम
करणारे डॉ.परम आनंद हे म्हणतात की,"प्रेमाचा मार्ग हाच बुद्धाचा मार्ग
आहे." तोच मानवी सभ्यतेचा मार्ग आहे किंवा त्यालाच धम्मसभ्यता असे
म्हणतात.ही धम्मसभ्यता भारतभर प्रसारित करणे म्हणजेच बुद्धमय भारताच्या
स्वप्नपुर्तीकडे वाटचाल करणे होय . त्यासाठी शिल्पकला संशोधन अत्यावश्यक
आहे. शिल्पकला संशोधनासाठी ते झपाटल्यागत काम करीत आहेत. स्वताची गाडी
नाही. पुरेशी साधने नाहीत.काम मात्र थांबलेलं नाही.सुरु आहे.मनात विचार
येतो,जर पुरेसा पैसा असता,साधनं असती,पाठबळ असतं, तर आज हे कार्य कुठल्या
कुठे गेलं असतं. पण या कडे कुणाच लक्षच नाही! सर्वांच लक्ष कुठे आहे.काही
कळत नाही. असा कोणता विभाग आहे ,कोणत क्षेत्र आहे,ज्या कडे या समाजच लक्ष
आहे? कोणत्याही क्षेत्रा कडे बघा एक टिंब सुद्धा दिसत नाही . मग ज्या
क्षेत्रात लक्ष आहे .असं कोणत क्षेत्र आहे. काही कळत नाही.
डॉ.परम आनंद यांनी" बौद्ध व्यक्तीची परिभाषा " हे पुस्तक लिहिले आहे.
त्याच बरोबर "ब्लिस बुलेटीन" नावाचे मासिकही ते चालवितात . पण हे
एकट्याचे काम नव्हे .सर्वच थरातून हे काम व्हायला हवे.ते होतांना दिसत
नाही.मग हे लोक काय करतात काहीच तर दिसत नाही ..निदान काही दिसावं अशी
अपेक्षा ठेवायची नाही का आम्ही . आमचा तो हक्क नाही का? या संदर्भात एक
कविता आपल्या समोर ठेवणे अप्रस्तूत होणार नाही .
दृष्टीपञ्ञा
थेरांच्या
गाथेतला पावसाळा
आणि
वर्षावासकाळातील
विपश्यनेचा
सहसंबंध
ज्या
पंचरंगी क्रांतीकारंजातून जातो
तिथेही
आंबेडकरी
समूहाच्या एकीकरणाची
दमदार
वाटचाल होतांना
पाहत
आहेत दोन डोळे
त्या
डोळ्यांतून निसटण्याची जीवघेणी तडफड-धडफड
व्यक्त
होताहे
कथा
कविता
कादंबरी
नाटक
समीक्षा
आणि
व्याख्यानांमधून
धाम्म
पाठशाळांमधून
पाली
वर्गांमधून
सामुहिक
मेळाव्यामधून
एकमेकांशी
जोडल्याच्या खाणाखुणातून
बघा
किती घाई सुरु आहे
आंबेडकरी
समूहाचे जबरदस्त प्रयत्न
दृगोच्चर
होतात ढोरमेहनतीतून
काय
साध्य होईल अथवा न होईल
याची
तमा न बाळगणारे
पटीसेन
दिसताहेत जागोजागी
सगळ्या
पटीसेनांनी आता अर्हत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे .त्यासाठी मार्गस्थ
होतांना दिसण्याच हे चित्र आहे
**
तृष्णा
वारंवारच्या जन्माच कारण आहे तृष्णा.हा वारंवारचा जन्म का घ्यावा लागतो?
ह्या जन्माच्या फेऱ्यातून सुटता येईल काय? अर्थातच ...त्यासाठी मरावं
लागेल ..पण मरणानंतर परत जन्म होणार नाही ह्याची ग्यारंटी काय? बुद्ध
सांगतात ग्यारंटी आहे ..तृष्णा मुक्ती ..
तृष्णा मुक्ती सहज साध्य नाही . पण अशक्य नाही . प्रयत्नांती शक्य आहे .
त्यासाठी फेऱ्यात अडकल्याची त्याला जाणीव व्हायला पाहिजे. आपण फेऱ्यात
अडकलो आहोत हे बऱ्याचदा आपल्याला कुणीतरी सांगत असते. एकदा का मनाने हे
स्वीकारले , की मग त्याची धडफड होते फेऱ्यातून बाहेर निसटण्याची.
त्यासाठी तो निरनिराळे मार्ग निवडतो . हे मार्ग बव्हंशी सांगी-वांगीचे
असतात . या मार्गांतून मात्र काहीही निष्पन्न होणार नसते . ते केवळ हात
पाय हलविणे असते. केवळ हात पाय हालवण्याने पैलतीर गाठता येणार नाही.
त्यासाठी आवश्यक असते पोहणे . पोहण्यासाठी कौशल्याची आवश्यकता असते . हे
कौशल्य जन्मता प्राप्त होत नाही. आणि आपणहून कुणी ते शिकवीत नाही . ते
आत्मसात करण्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो . तन मन धनाचा त्याग
करावा लागतो. कोणते आहे ते कौशल्य ? तृष्णामुक्त होण्याचं कौशल्य आहे ते
.
ही शाळा सर्वप्रथम बुद्धानेच उघडली . हे ज्ञान आधी नव्हत काय? होत ना .
पण ते सर्वतोमुखी नव्हत. बुद्धाने प्रथम ते आत्मसात केलं . आणि नंतर
जनतेला सांगतांना त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं . हे सांगतांना
त्यांनी लोकभाषेचा वापर केला . लाख प्रयत्न करूनही मनाला काबूत करता करता
नाकी नऊ येतात ना ? पण मनच ते. ते अपरिवर्तनीय नसते. ते परिवर्तनीय असते
. ते सतत हलत असते. हलता हलता ते सुख घेऊन येते. आणि मनाला प्रसन्नता
,गारवा देते. पण त्यान काही फक्त तिथेच जाण्याचा ठेका घेतलेला नसतो. ते
दुक्खाकडेही तितकेच तडफेने धाव घेते.अगदी लाज वाटावी,घृणा वाटावी असेही
विचार घेऊन येते ते . त्यासाठी त्याला आवर घालता यायला हवा. आवर घालण्याच
प्रशिक्षण घेता येते . हे प्रशिक्षण विपश्यना सारख्या प्रशिक्षणातून
घेण्याची प्रथा आहे . पण विपश्यना हा संपूर्ण मार्ग नाही . तो तर प्रारंभ
आहे .त्याहून पुढे खूप आहे .
तृष्णामुक्त होण्याचा मार्ग कृतीतून जातो . कृतीयुक्ततेतून तृष्णा मनातून
बाहेर काढता येते.कृतीयुक्ततेवर आपला प्रचंड विश्वास असतोही . पण नेमकं
काय करायचं हा प्रश्न असतो . करावसं वाटत असते . बाहेर पडायचं असते. पण
कसं ??
प्रारंभीच्या तृष्णेच स्वरूप समजून घ्यायला पाहिजे . म्हणजे तिला
वाढण्यापासून रोखता येईल. प्रारंभी काय असते? हे आपलं आपल्याला माहित
असते . आपल्या मनात इच्छा निर्माण झाली . की ते आपल्याला कळायला हव असते
. आता त्या इच्छेचं काय करायचं हे आपल्यावरच अवलंबून असते.पण कोणत्याही
परिस्थितीत भगवान बुद्ध म्हणतात 'सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे
आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष.' हा संतोष कोणता आहे? तो
'ठेविले अनंते ,तैसेची राहावे .....' असा परिस्थिती शारण्य भाव नाही.
बाबासाहेब स्पष्टीकरण करतांना सांगतात की ,What the buddha meant when he
said that contentment is the highest form of wealth is that man should
not allow himself to be overpowered by greed which has no limits"
अमर्याद अश्या लोभाच्या अधीन जर तो झाला .तर त्याची तृष्णा थांबणे अशक्य
आहे.तृष्णा ही काबूत ठेवली पाहिजे . तृष्णा म्हणजेच लोभ हा अनेक वाईट
गोष्टींना उत्पन्न व्हायला कारणीभूत ठरतो.आनंद भांतेजींना तथागत या
बाबतीत सांगत आहेत . बाबासाहेबांनीच उदाहरण दिल आहे. एका मंगल सायंकाळी
आनंद भांतेजींना हा प्रश्न पडला असावा.
" तथागत आपण प्रगतीचा पुरस्कार करता. सतत प्रयत्नांना आपण प्राथम्य देता.
मानवाने जीवनात उत्कर्ष साधावा असे आपण सांगता."
"होय, आनंद तथागत तसे सांगतात"
" आपण सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष असही म्हटलं आहे."
"होय,आनंद तथागत तसे सांगतात "
"पण तथागत मला आपल्याला विचारायचं आहे की निर्धन लोक धन्य आहेत असे आपण
कधीही म्हटलेले नाही . पिडीताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी जोमाने
प्रयत्न करावे असे आपण म्हणता.आपण ऐश्वर्याचे स्वागत करता तथागत, तथागत
आपण सांगता की दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने
म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा .
आपण हे सांगता तथागत मग माझ्यासमोर हा प्रश्न उभा राहतो की,हे प्राप्त
करण्यासाठी मानवाला प्रचंड इच्छाशक्तीची गरज असते. प्रबळ इच्छा
असल्याशिवाय मानव प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडणार नाही .मग तथागत ही
तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा?"
"आनंद, आता मी सांगतो ते काळजी पूर्वक ऐका. इच्छा असल्याशिवाय मानव
नाही.इच्छा मनात निर्माण होतात . मन हे मनोमय असते. मानव त्यातूनच ओळखला
जातो. जशी इच्छा असेल तशी कृती मानव करतो . ही इच्छाशक्ती मानवाच्या
जगण्याला आवश्यक आहे . इच्छाशक्ती च्या जोरावरच तर मानवाने ही उत्क्रांती
साधली आहे." बाबासाहेबांनी समर्पक दाखले देऊन तृष्णा त्याग महती विषद
केली आहे. ते सांगतात ,
"लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते, आणि जेव्हा त्या इच्छेचे
मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेत पर्यवसान होते , आणि जेव्हा ही
स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा
धारण करते ,तेव्हा त्या इच्छेचे लोभात रुपांतर होते." यावर आनंद भंतेजी
अवाक झाले असतील . तथागतांनी त्यांच्या चेहेऱ्याकडे लक्ष न देता ते पुढे
सांगताच राहतात ......आनंद हा लोभ असा आहे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट
गोष्टींचे त्यांच्या पासून निर्माण होते. शारीरिक मारामारी,देहा-मनाचे
आघात ,हजारो प्रकारची भांडणं ,विनाकारणचे वाद आणि निरर्थक प्रतिवाद ,
भांडण-झगडे-कलागती नाहकच , अकारण निंदा, आणि मुख्य म्हणजे असत्य भाषण
ह्या आणि इतरही काही असंख्य अश्या गोष्टी आहेत की ज्यांचे मूळ तृष्णा आहे
. म्हणून आनंद लोभावर संयम ठेवावा." आसमंतात तथागतांचे हेच शब्द गुंजत
होते .लोभावर संयम ठेवावा.... . लोभावर संयम ठेवावा.... .लोभावर संयम
ठेवावा.... .लोभावर संयम ठेवावा..... .बाबासाहेब म्हणतात वर्ग कलहाच हे
यथा- तथ्य विश्लेषण आहे . म्हणून तर साऱ्या जगान हा राष्ट्र धर्म
स्वीकारला आहे ना ..!
***************************************
बौद्ध जीवन मार्ग
बुद्ध आणि त्यांचा धम्म या महा ग्रंथात बाबासाहेबांनी बौद्ध जीवन
मार्गाचे तेरा पैलू सांगीतले आहेत.सगळ्याच पैलूंमध्ये जीवनच हृदयंगम
दर्शन आहे. तेरावा पैलू आत्यंतिक महत्वपूर्ण आहे.तेराव्या पैलू मध्ये
बाबासाहेब लिहितात , "सद्धम्म आणि असद्धम्म यांचा संकर करू नका." या
बाबतीत त्यांनी पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.........
१] जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे
कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
:- असे लोक सतत भासमान जगतात वावरत असतात. जे निश्चित खोटे असते त्यालाच
ते खरे मानत असतात. खऱ्याला मात्र खोटे समजून बसतात. अंधश्रद्धामुलक
जीवनपद्धतीच्या अंगीकारामुळे ते सत्यापासून कोसो दूर असतात. ह्याच धारणा
वर्षानुवर्षे स्वीकारल्याने ज्ञान विकासाशी त्यांचा स्पर्श होत नाही. आणि
ते असत्यात खितपत पडतात.आपण जे जगत आहोत ते जगणे खोटे आहे.याची पुसटशी
जरी जाणीव त्यांना झाली तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडू
शकतो.त्यासाठी मात्र त्यांचे स्वायत्त प्रयत्न हवे असतात.
२] जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे
कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
:-असे लोक सतत भासमान जगतात वावरत असतात. हे लोक आपला विवेक हरवून बसलेले
असतात. त्यांना सत्याचा अजून गंधही स्पर्शिलेला नसतो. ते कसे जगतात,हे
त्यांच त्यांनाही कळलेलं नसतं. जगण हा काय प्रकार आहे हे ज्ञान अजून
त्यांच्यात उगवायचेच असते. समोर उभ्या असलेल्या धादांत वास्तवाला ते
जुमानीत नसतात.त्यांच्या मनाला हवे असते त्याच प्रकारचा मथितार्थ ते
अंगिकारतात. त्यांना वास्तवाशी काहीही देणे घेणे नसते. असे लोक प्रसंगी
आपल्या उपकार कर्त्यांवरही अन्यायच करतात. कारण ते खऱ्याला खरे मानणारे
नसतात. सत्याप्रत पोचणे हा जीवन मार्ग अजून त्यांना गवसणे बाकी
असते.शहाण्या लोकांना अश्यांची दया येते.
३] जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी
सम्यक दृष्टी आहे. त्यांना सत्य लाभते.
:-सम्यक दृष्टीचा लाभ होणे हे मानवी जीवनाचे परम अरीय सुख असते.
त्यासाठीच माणसे धडपडत असतात. सत्याला सत्य ओळखता यायला हवे असते.
असत्याला असत्य म्हणून ओळखता आले पाहिजे .जीवनाचे मंगलकारक अस्तित्व
त्याच्याच परिचयाने जाणवेल.वास्तवाचे अंगभूत ज्ञान होणे हे सहज साध्य
नसते. तेथे पाहिजे जातीचे. आंबेडकरी समूहातील लोकांना जन्मताच हे इंद्रिय
लाभलेले असते असे म्हणतात. बुद्धिवंत समाज त्यांच्या समवेत असण्याचे तेच
बलशाली लक्षण आहे. ही सम्यक दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी अविरत श्रम
आणि पराकोटीचा त्याग आवश्यक असतो. जे हे करण्यास धजावतात,त्यांनाच ती
प्राप्त होते. तिची प्राप्ती म्हणजे जीवनाचे इति कर्तव्य .
४] घर नीट शाकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते
त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते.
:-असंस्कृत मन म्हणजे अपरिपक्व मन.अश्या मनात विकारांचे थैमान असते.
तृष्णा तर सहज प्रवेश करते. मन हे परिपक्व करता यायला हवे.अपरिपक्व मन
म्हणजे उथळ आणि हलके मन.हे मन वरवरच्या थिल्लर बाबी चटकन स्वीकारते .
जीवनाकडे गंभीरपणे पाहू देत नाही. मजबूत होऊ देत नाही. वानरासारख्या ते
इथून तिथे उड्या मारीत राहते.
५] घर नीट शाकारलेले असले की त्यात ज्या प्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत
नाही त्या प्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही.
:-सुसंस्कृत मन म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे.सुसंस्कृत मन
म्हणजे,अविकारी मन. ज्यावर कोणत्याही विकारांचा परिणाम होणार नाही.
उपमेने म्हणायचे झाल्यास लहान बालकाच्या अबोध मनासारखे हे मन असते.
बालकाच्या मनाला जाणिवांचा स्पर्शही नसतो . मात्र प्रौढ मनाने सगळे विकार
अनुभवलेले असतात. पण त्यांना तो चिकटू देत नाही.अविकारी राहतो.तो
प्रयत्नपूर्वक आपले मन सुसंस्कारित करीत असतो. कोऱ्या पाटी सारखे . मनावर
काहीही न उमटू देणारे . नितळ. स्वच्छ.पारदर्शी.निर्मळ.
६] उठा! प्रमादी राहू नका .धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा.जो त्या
प्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो.
:-प्रमादी आचरणाने आयुष्याचा बट्ट्याबोळ होतो.दोषपूर्ण जीवन जगण्याला
गात्रे उत्सुक असतात. ते काही जगणे नसते. प्रमादी आयुष्य मानवी मनाला
प्राणिज पातळीवर आणून सोडते. माणसाचा कचरा करते. उत्साहाच्या ओसरा नंतर
अवयवांनी शिथिल व्हावे , मृतप्राय व्हावे असे हे बीभत्स जगणे असते.
७] सन्मार्गाचा अवलंब करा.कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे
लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात.
:- सन्मार्गाचा अवलंब करणे म्हणजे काय? तर अरीय अष्टांगिक मार्गाचा अवलंब
करणे. आपल्या मध्ये सम्यक दृष्टी विकसित करणे.ही सम्यक दृष्टी विकसित
होण्यासाठी सर्व प्रथम निष्ठा निर्माण व्हायला पाहिजे.
हा जीवन मार्ग स्वीकारतांना एक अत्यंत महत्वाचे धोरण अंगिकारले पाहिजे की
सद्धम्म आणि असद्धम्म यांचा संकर होऊ देता कामा नये. यांची जर सरमिसळ
झाली तर निरामय नैसर्गिक जीवन जगता येत नाही. निरामय जीवन जगता
येण्यासाठी खंबीर असावे लागते.चीत्तधारणा बळकट असाव्या लागतात.
स्वीकारलेला मार्ग अढळपणे अंगीकृत बाणवण्याची धमक जागी व्हायला हवी.
---------------------------------------
आंबेडकरी तरुण काय करीत आहेत ...........
वर्तमान परिस्थितीत आंबेडकरी तरुण काय करीत आहेत काहीच कळत नाही.
आंबेडकरी तरुणांना कुठे जायचं आहे हे त्यांनी निश्चित केलेलं नाही. हे
असं का झालं. हे समजून घेणार कोण.कुणाला वेळ आहे. आंबेडकरी तरुणांच्या
कुटुंबांना आणि मानसिकतांना पेलून धरणारे डॉ. वसंत शेंडें सारखे भाऊ-बंद
कुठवर करतील. त्यांना आनंद होईल असे आंबेडकरी तरुण वागत नाहीत.
ते स्वतःचे स्वत्व विसरलेले दिसतात.हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ
आहे.कौटुंबिक स्थिरत्वासाठी इथे-तिथे भटकत आहेत. आंबेडकरी तरुण पोलीस
भरतीत बग्गम दिसतात पण भरती झालेले दुसरेच असतात. निरनिराळ्या स्पर्धा
परिक्षांचे पहिल्या चाचणीचे पेपर देतांना दिसतात, दुसऱ्या चाचणीत
त्यांचीच गळती झालेली असते. कोचिंग क्लासेस मध्ये ते नसतात. प्रचलित
तंत्रांपासून ते अनभिज्ञ आहेत.बांधकाम क्षेत्रात इंजिनियरच्या हाताखाली
काम करणारे आंबेडकरी तरुणच असतात, ते इंजिनियर नसतात. ते साधे मिस्त्री
ही नसतात. नाक्यावर भल्या सकाळी चार-पाच जणांच्या टोळीने ते काम सांगायला
येणाऱ्याची वाट पाहत असतात. धगधगती दुपार डोक्यावर नाचवतात. मग सर्व्हिस
गल्ली साफ करण्याचे काम मिळाले की यांना कोण आनंद होतो. आंबेडकरी
तरुणांची नजर आजही जज्जाच्या खुर्चीवर नसून पट्टेवाल्याकडे भिरभिरतांना
दिसते. भोळे आणि कमालीचे इमानदार असल्यामुळे लोक यांना चटकन ओळखतात.
घरातल्या महत्वाच्या सामानाच्या शफलिंग साठी यांचीच निवड करतात. वर रातची
पोळी आणि लोणच मिळालं की हे खुश. उरली सुरली पोळी खिशात घालतात,नालीत
फेकत नाहीत. न जाणो आली सुगी फुगले गाल,गेली सुगी मागचे हाल.अस व्हायचं.
बरेचसे ग्र्याजुयेट तरुण रिक्षा चालवतात. भाडे वगळून किमान २००रु. मिळावे
अशी अपेक्षा असते. त्यासाठी ग्राहकांशी गोडीने वागतात. ग्राहकांच्या
सामानाची हमाली करतात. ग्राहकांशी संवाद साधतात.त्यांचं मनोरंजन होईल असे
वागतात. बोलतात. किंवा नाहीत बोलत. इतर रिक्षा चालकांशी मान-मरातबाने
वागतात. कुणाचीही भांडणे सोडविण्यात अग्रेसर राहतात. पेपर वाचतात.
त्यातल्या विनोदांवर हसतात. लोक म्हणतात शिकला सवरला अन वाया गेला.
आंबेडकरी तरुण त्यांनाही हसवितात. जणू काही जगाला हसविण्याची मक्तेदारी
यांचीच आहे. वकिलांचे पिल्यांटू होतात. साऱ्या केसेस सांभाळतात आणि
पिल्यांटूचे पिल्यांटूच राहतात. तलाठ्यांचे अनधिकृत कोतवाल होतात.
रात्रंदिवस त्यांचे रेकॉर्ड सांभाळतात. पण अधिकृत कोतवालही होऊ शकत
नाहीत. प्रतिष्ठानांवर नोकरी करतात सेल्समन,असिस्टंट डॉक्टर, डेप्युटी
चीफ, इत्यादि आणि काम करतात झाडू पोछा . डेसिग्नेटीव्ह कामांची वाट पाहत
राहतात. वाटच पाहत राहतात. कंटाळतात. आणि छोट्याने मोठ्यापुढे समायोजन
स्वीकारावे तसे,आहे त्या परिस्थितीत आनंद मानतात. हसतात खळाळून.
त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी हे आनंदाश्रू असतात.असे समजून त्यांच्याकडे
पाहून इतरही हसतात.
बुद्ध विहारात आंबेडकरी तरुण फारसे दिसत नाहीत.दररोज नाही-रविवारीही
नाही. धम्मापासून आंबेडकरी तरुण कोसो दूर आहेत. साधे पंचशील त्यांच्या
पाठ नाही. पुष्प,धूप,दीप पूजा नाही. त्रिरत्न वंदना नाही.जयमंगल अठ्ठगाथा
नाही. काही नाही. आंबेडकरी तरुण ताकाला जाऊन भांडे लपवित नाहीत. ते सरळ
सांगतात आम्हाला क्रिकेट आवडत नाही. ते क्रिकेट पाहत नाहीत. क्रिकेट खेळत
नाहीत. तासंतास क्रिकेटवर चर्चा करीत नाहीत. टी.व्ही. वर प्रक्षेपित
होणारा लाईव्ह बजेट पाहत नाहीत. बजेट वर चर्चा करीत नाहीत. राजकारणावरील
चर्चेत सहभागी नसतात. सामाजिक प्रश्नांच्या चर्चेत सहभागी नसतात. चर्चा
झाल्यानंतरचे असंतुष्ट पर्यवसान म्हणजे आंबेडकरी तरुण असतात. समूहात
आंबेडकरी तरुण दिसत नाहीत.ते एकेकटेच इतरांना आवडतात. आंबेडकरी तरुण
इतरांच्या आशा आकांक्षा फलद्रूप होण्यास मदतच करतात.तरीही ते पोटाच्या
मागे ओढल्या सारखे पळत असतात.
आंबेडकरी तरुण नगरसेवकांचे बॉडीगार्ड बनतात. नगरसेवकांवर संरक्षण कवच
बनतात. नगरसेवक म्हणेल त्यावर धाऊन जातात. तोऱ्यात फिरतात. प्रसंगी
मर्डर-हाप मर्डर ची केस होते. मग तारुण्याची दहा -बारा वर्षे जेलात सडत
राहतात. लग्न झालेलं असेल तर बायका लेकरांची वाताहत होते. लग्न झालेलं
नसेल तर आई-बापाची दुरावस्था होते. जन्माला यायचं. जनावरासारख खायचं.आणि
किडा मुंगी सारखं मारायचं. अशी आंबेडकरी तरुणांची अवस्था आहे.
आंबेडकरी तरुणांनी काय ऐकायचं. कुणाचं ऐकायचं. ऐकून काय करायचं.काय सोडून
द्यायचं. काय घ्यायचं.कसं स्वीकारायच. कुठे जायचं. याची कारणे
शोधण्यासाठी हातपाय हलविण्याचे चिन्ह दिसत नाहीत. प्रबोधन करणारे किती
करतील. त्यांना हवी तशी भूमी मिळत नाही. मग प्रा. अशोक इंगळे सारख्यांना
फंटूश बनून राहणे आवडते (संदर्भ- युद्धपक्षी ).प्रबोधनाचे संदर्भ बदलतात.
आंबेडकरी तरुण डोके वर करून आशाळभूतपणे आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
पाऊस येईल असे त्यांना वाटते. पण कोरडवाहू शेतीचा आता जमाना राहिला नाही
अन ओलीत करण्याची कुणात हिम्मत नाही. असे झाले आहे. आता तर ओलीतवाहू आणि
कोरडवाहू सगळे एकाच ओळीत येवू पाहत आहेत. आणि आंबेडकरी तरुण जिथल्या तिथे
ढिम्म आहेत.
संस्थात्मकरित्या काही करून पाहणे त्यांना शक्य होत नाही. मध्यंतरी
बेरोजगार युवकांच्या नोंदीकृत संस्थांसाठी काही सरकारी कामे देण्याचे
ठरले होते. भराभर यांनी समूह नोंदीकृत केले. आणि झाले. पुढे काय.
त्यामध्ये आंबेडकरी युवकांच्या एकाही संघटनेला काही काम मिळाले असेल असे
दिसत नाही. एका गावातून आंबेडकरी युवकांच्या किमान दोन संघटनांनी जरी अशी
कामे मिळविली असती तरी आंबेडकरी तरुण सशक्त आहेत असे म्हणता आले असते. पण
आडातल पाणी पोहऱ्यात ओतण्यासाठी दोरच आंबेडकरी तरुणांना सापडत नाही आहे.
आडाला आणि पोहऱ्याला जोडणाऱ्या दोराला जर धम्म म्हटले तर तो दोर बळकट कसा
करता येईल, याकडे आंबेडकरी तरुणांचे लक्ष नाही.ज्यांचेकडे आशेने पहावे
त्यांचेच आशाळभूत नजरांकडे लक्ष नाही. ही वस्तुस्थिती कोण नाकारेल. या
समग्र पार्श्वभूमीवर शासनाने विचार केला पाहिजे. आंबेडकरी तरुणांसाठी
ज्ञानाची कवाडे उघडी केली पाहिजेत. मानवतेच्या विकासासाठी,ज्यांच्यामध्ये
उपजतच धम्मबिजे आहेत त्यांची वाढ करून जोपासले पाहिजे. राष्ट्राचा
विकासाचे हे महाचीवर ह्याच बिजांतून अंकुरणार आहे. असे सांगणारा इतिहास
अजूनही जीवंत आहे. ज्यांना मनापासून देशासाठी-देशवासीयांसाठी काही
रचनात्मक करायचे आहे. त्यांना हा इतिहास विसरून चालणार नाही. कारण जे
इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नसतात.
●●●
No comments:
Post a Comment