।। वेळूवन ।।
वेळू चे हिरवे पान वाजवी छान शीळ हलकीशी
त्यातून हिंडते कोण ही गोरीपान पोर इवलीशी।
ह्या चंचल वाऱ्या सवे होऊनी लीन धूंद बेधूंद
डोळ्यात विसळुनी ऋतू येतसे झाक गर्द पिवळीशी।।
( बिंबीसार पत्नी क्षेमा ही खूप गर्विष्ठ होती. स्वसौंदर्याचा मद चढला होता तिला . तथागत रुपाच्या लावण्यभावाला महत्व देत नाहीत हे तिला कळले. म्हणून ती त्यांच्यासमोर येईना.स्वतःलाच वारंवार आरश्यात पाही
पण राजा बिंबीसाराने प्रयत्न सोडले नाहीत.काही दिवस असेच जाऊ दिले.
एके दिवशी. बिंबीसाराला एक शक्कल सुचली. राजकवींना पाचारीत केले. भर दरबारात वेळूवनाचे वर्णन करा म्हणून त्यांना सांगण्यात आले.
उजव्या हाताने धोतराचा सोगा धरून, डावा हात नाचवीत राजकवींनी दरबारी रागात काव्यगान केले.
कवीच्या वर्णनाने राणी मोहीत झाली. वेळूवन पाहण्याची उत्कट इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली.लागलीच रथ जुंपला.रथात बसून वेळूवनाकडे जाऊ लागली.
तिने वारंवार स्वतःला बजावले की आपण केवळ वेळूवन पाहायचं. नसत्या भानगडीत पडायचं नाही. उगाच घेणं ना देनं कंदिल लाऊन नेणं अशातलं होऊ नये.
तिथे तर तथागतच होते....!!! त्यांना पाहून तिला नाक मुरडावेसे वाटले पण तिला तसे करता येईना. वारंवार तिची नजर तथागतांवर जाऊ लागली. त्यांच्या स्मिता वरून हटेना.
आपल्या चित्राकारी शब्द सामर्थ्याने त्यांनी नेहेमी प्रमाणे आजही श्रोत्यांना संमोहितच केले जणू---!
हुबेहूब तिच्यासारखीच दिसणारी गोरीपान आकर्षक स्त्री निर्माण केली. त्या तरुण आणि मादक सौंदर्यवतीवर श्रोत्यांची नजर खिळली.
तिचं वय वाढत गेलं. वाढता वाढता 80 वर्षे झाली. गोणपाटा सारखी चामडी दिसू लागली. पापण्या लोंबल्या. नाकाला शेंबुड चिकटलेला. मान सारखी हलत होती..
क्षेमा भानावर आली. तथागतांनी तिला तिच्या भाषेतच धम्म सांगितला होता. तो तिला आकळला.ती भिक्षूणी झाली.
नाम~रूप हे एकच असत असं तिला आता कळू लागलं. या नंतर तिने रथाकडे पाहीले.तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. )
***
त्याग
घराची डागडुजी सूरू होती.
बाबांचा आणि प्रशांतचा जोरदार वाद झाला. बाबांनी सारं घर डोक्यावर घेतलं. अशावेळी आई हेच एकमेव स्थान..! किंवा आईच आपणहून हस्तक्षेप करायची.
आईने नेहेमीप्रमाणे दोघांनाही सोफ्यावर बसवलं. त्यांना प्यायला फ्रीज मधलं पाणी आणलं. ते जास्त थंड असल्याने मीक्स करावं लागलं. पाणी पिऊन झाल्यावर प्रशांत किचनच्या ओट्यावर ग्लास ठेवायला मध्ये गेला.त्याचे डोळे डबडबले. तो आई कडे पाहू लागला. तेव्हा बाबा ओरडले,"फत्राची अक्कल नाही अन अंगणात खड्डे करतो म्हणते."
आई धावत पळतच आली. तिने बाबांच्या हातचा ग्लास घेतला.घाईगडबडीने अंगणात आली. लगबगीने किचन कडे जाऊ लागली. चहा झाला होता.तो लवकरात लवकर त्यांना द्यायला हवा होता.या प्रसंगी तेच औषध होतं. धावता पळता तिचं लक्ष चुकलं आणि सांडलेल्या पाण्यावरून ती धपकन पडली.
तिच्या पडण्याचा आवाज येताच प्रशांत आणि बाबा विद्युत चपळाईने धावतच गेले. तिला उचललं. आईला खूप यातना होत होत्या वाढत्या वयानुसार तिला हे दुःख सहन होईनासे झाले. ती विव्हळू लागली. तिला पटकन डॉक्टर कडे घेऊन गेले.
डॉक्टरांनी एक्सरे काढला. तो पाहून डॉक्टर म्हणाले," बरं झालं. ढोपराजवळची हड्डी तुटली असती तर किडनीत घुसली असती. आई बालबाल वाचली आहे."
एक दिवस भरती ठेवून दुसऱ्या दिवशी दोघांही बापलेकानी तिला घरी आणले.
घर परत हसू नाचू बागडू लागलं.
प्रशांत काही बोलेना कि चालेना बाबा इकडून तिकडून संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे पण तो हुं की चूं करत नव्हता.सकाळी व्यायामाला जात नव्हता.पुस्तक वाचत नव्हता. अभ्यास करत नव्हता. पट्ट्याच्या खुर्चीवर बसायचा नि पट्टयांचा एकेक धागा हातातल्या चाबीने तोडत रहायचा.
बाबा मजुरांना काम समजावून सांगायचे. सिमेंट रेतीवर बारीक नजर ठेवायचे. सगळं स्वतःच करायचे. प्रशांत कडे पाहून त्यांनाही भडभडून यायचं. प्रशांतचा रडवेला चेहरा त्यांना अस्वस्थ करायचा.
जवळपास सगळं काम आटोपल. बाबांनी स्टूल ओढला. त्याच्या समोर त्या स्टुलावर बसले.त्याच्याकडे मिस्किलपणे पाहत हसत म्हणाले," फ्लोरिंगच काम तुला जसं वाटते तसं कर जा.."
प्रशांत ने मान वर केली.त्याच्या डोळ्यात लकाकी आली.बारा हत्तीचं बळ अंगात संचारल्यासारखा तो खुर्चीतून उठला. त्याच्या समवेत बाबाही उभे राहिले.प्रशांत सांगू लागला- प्रत्येक चार फरशांचा चौकोन झाला की त्यांच्या कोपऱ्यावर ग्लासाएवढं छीद्र ठेवायचं. या छीद्रातून पावसाचे पाणी अडेल आणि जमीनीत मुरेल. हिवाळ्यात त्या ठिकाणी छान गवताच्या थोंबी उगवतील त्या किती सुंदर दिसतील..!
बाबा त्याच्याकडे आश्चर्याने आणि अभिमानाने पाहू लागले.
***
एका विषयाची गोष्ट :पटीसेन
तथागत म्हटले की त्यांचा भिक्षू संघ डोळ्यासमोर उभा राहतो.महासागरासारखा विशाल. अनेक नद्यांचं पाणी एकजीव व्हावं. कोणता थेंब कोणत्या नदीचा आहे हे ओळखू येऊ नये, असा... त्यात पटीसेन नावाचे एक भिक्षू होते.
ते अर्हत होते.अर्हत होणे म्हणजे दुःखमुक्त होणे. अर्हत भिक्षूंना सर्व विषयांचं ज्ञान असतं.
अर्हत होणे ही कष्टसाध्य अवस्था आहे. आळशांना कसलं हे ज्ञान...!!
पटीसेन आळशी नव्हते ..जिद्दी होते पण 'ढ' होते. त्यांना एकही गाथा पाठ नव्हती. गावात भिक्षाटनासाठी गेले की गावातले लोक गटागटाने फिदीफिदी हसायचे. सहकारी भिक्षू सुद्धा त्यांची निर्भत्सना करायचे. 'ढ' म्हणून चिडवायचे.पटीसेन मान खाली घालून बिचारा फक्त ऐकायचा.
तो खूप प्रयत्न करीत असे पण जमेना.तसा तो काही अगदीच हा नव्हता.छान सुरु होतं. पहिला वर्ग पास, दुसरा वर्ग पास, तिसरा वर्ग पास, चौथा वर्ग पास, पाचवा वर्ग पास, सहावा वर्ग पास, सातवा वर्ग पास, आठवा वर्ग पास, नववा वर्ग पास,मात्र दहावा वर्ग नापास.....सुरवातीला काही वाटलं नाही. पण हळू हळू लक्षात येऊ लागलं. तसतसं त्याला खूप दुःख होऊ लागलं. त्याने सप्लिमेंट्री दिली.. पण नापास.. मग अॅनुअल दिली पण.. ना पा स .. सप्लिमेंट्री अॅन्यूअल ... अॅन्यूअल सप्लिमेंट्री.. असे करीत करीत तीन वर्षे गेली. पण.. अंहं... तो काही पास होईना. काय करावे सूचेना .
अशानं आपली इज्जत दिवसेंदिवस कमी होत आहे. या विचाराने त्याचं डोकं फुटायची वेळ आली. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. रडून रडून सुजलेले डोळे लाल झाले. सकाळीच उठून तो तडक तथागतांसमोर येऊन ऊभा राहीला. धुसफूस धुसफूस ..धुसफूस.. धुसफूस.. तथागत म्हणाले," या, बसा"
" नाही"
"....."
डबडबलेल्या आसवांनी डोळे भरलेले .बोलला, " आधी मला हे सांगा की मी नापास का होतो... " नाक ओढत त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून पुढे म्हणाला," आणि तथागत मला सांगा की मी पास कसा होईन हो s?"
तथागत हसले , म्हणाले, " अहो पटीसेन, खूप सोप्प आहे ते..तुम्हाला किती विषय आहेत"
"आठ"
"कोणकोणते"
"मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नाग. शास्त्र,"
"तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करता"
"सर्वच विषयांचा करतो थोडा थोडा"
" आता यापुढे असं करा " पटीसेनाच्या चेहऱ्यावर हसू आलं
" फक्त एकाच विषयाचा अभ्यास करायचा"
"कोणत्या"
"तुम्हाला कोणता विषय खूप आवडतो"
" गणित"
"का"
" गणितात काय फक्त संख्या , बेरीज ,वजाबाकी, गुणाकार ,भागाकार एवढं केलं की झालं"
" झालं तर मग.एक महिनाभर फक्त गणिताचाच अभ्यास करायचा.बस."
त्या विस्तीर्ण पटांगणात अडीच हजार भिक्षू भिक्षूणी अवाक होऊन ऐकत होते. पटीसेन मुग्ध झाले आणि परतले.
ज्या अर्थी तथागतांसारखा सम्यक संबुद्ध सांगतोय त्या अर्थी त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. असे पक्के मनाशी ठरवून ते एकाच विषयाचा अभ्यास मन:पूर्वक करू लागले .. आणि सातव्याच दिवशी अर्हत झाले..
तरुण भिक्षूंना मार्गदर्शन प्रवचनासाठी जाऊ लागले. त्यांनी दुरून येतांना पहिले की पटीसेन येताहेत तेव्हा ते आपसात कुजबुजू लागले.की पटीसेन आले की त्यांना मान द्यायचा नाही. ते म्हणतील त्याच्या उलट म्हणायचे. त्यांना त्रस्त करून सोडायचे....... पण तसे झाले नाही ते जसजसे जवळ येऊ लागले तसतसा त्यांचा विचार बदलला त्यांच्या चेहऱ्यावरील अर्हत्वाच्या शांत शीतल प्रकाशाने तेही शांत झाले आणि पटीसेन येताच सर्वजण उठून उभे राहिले.
***
No comments:
Post a Comment