सुत्त सार / ललित


•आंबेडकरी समूहाचे गर्भमानस..•


मी प्राणाच्या देठावरचे दु:ख काटेरी खुडतो
जीवनाच्या राखेमधूनी मी जन्म घेऊनी उडतो...

*युगकवी केतन पिंपळापुरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकदा याना!एकदाच फक्त..! तुम्ही जे काही करून ठेवलंय त्याचा नीटसा उलगडा करून द्या.मला काहीच कळेनासं झालंय.खातो-पितो पण पचत नाही आणि काय खातोय हेही समजत नाही...
माझ्याही स्वत्वातून धूपाचा मंद सुगंध यावा.विविध फुलांचा गंध माझ्याही गाभ्यात दरवळावा,मलाही वाटतं...! तुम्ही तशी व्यवस्थाच करून गेलात हे मला माहिती आहे. मी ते पाहातोय ....शोधतोय ..पण मला व्यक्त होता येत नाहीय नीटसं...
जाणिवांच सम्यक आकलन जेव्हा तुम्ही संवीधानसभेच्या पहिल्या भाषणात ओतलं . आणि जे सबंध सभांमधून वाहत राहीलं त्याचा परिपाक म्हणजे आमच्या देशाची सुरक्षीतता...असे जर आहे तर मग माझे काय?का माझ्याच मागे उगारलेल्या विखारांच्या संगीनी..?
बाबासाहेब..! आता हे छिन्न विदीर्ण झालेले माझे शरीरावयव एकदा द्या जोडून. डोक्याच्या जागेवरचं डोकं हलवा जरा एकदा... एकदा फक्त..नंतर मी करतो सगळं बरोबर. एक तर काय आहे की ; तुमची झाली आहे सवय...तुम्ही घालून दिलेल्या सवयी अंगवळणी नाही पाडून घेता आल्या .तुम्ही लाडच इतका केला की मला काही करूच दिलं नाही. मी तरी काय करू...!!
तुमच्या आशयसंपृक्त शब्दकळांनी तुम्ही तुमचं आणि माझं चीरस्थाई स्थान विश्वपटलावर स्थापीत केलंत.मानवी व्यवहारासंबंधातलं तुमचं सम्यक आकलन ज्या क्रांतीराज्यातून जाते, तिथेही तुम्ही मला नेऊन बसवलंत.! चोवीसतास तुमच्या गर्भमानसी मीच..हा देश....हा देश-ह्या देशातील तमाम विचारधारा....जागर शाखा....त्यांचे संधिसंबंध..............तुमचा ज्ञानबोध अविरत...
तुमच्या देहा-मनात आणि माझ्या देहा-मनात पोकळी नाही.तुम्ही आणि मी अभिन्न.तुमची लेखणी माझ्याचसाठी. माझे अस्ताव्यस्तत्व तुमच्यासाठी....तुम्ही सातासमुद्राहून खोल मनाची माय. एकदा हा गाडा नीट लावून द्या.माझ्याच्यानं नाही होत गड्या आता काही....!
तुम्ही कसे....खळखळणारा झरा.तुम्ही आनंद.तुम्हीहर्ष.तुम्हीच मुदित.तुम्ही ऊर्जा.ते द्या परत एकदा.मग नाही म्हणनार की परत या म्हणून.मैत्रेयहोऊन या की सम्राट होऊन या !पण तुम्ही याच.
तुम्ही गेल्यानंतर मला आता उडताही येत नाही नि बसताही येत नाही. क्षणभर विसावा घ्यावा अस घर ऊरल नाही. ऐक्य केलं. मोडलं.परत केलं.परत मोडलं.पँथर झालो.कुठंतरी थांबलो.सहनशीलता वाढवली.भोतमांगेला विसरलो. काय काय विसरलो...! एका मंत्रीपदासाठी भूभू भुंकलो पण रिकामाच परतलो.एवढा कसा मी दीनवाना झालो. माझ्या सांडलेल्या रक्तओघळावर पाय रोऊन जे उभे झाले तेही कसे विसरले? आरक्षणात मीच झेलल्या काठ्या आणि मीच लाभार्थ्यांच्या यादीत मागे राहीलो. मीच माझी काळजी घेतली नाही आणि मीच मला खुल्या आणि निर्मळ दृष्टीने स्वीकारले नाही.मी माझ्यावरच कुरघोडी करीत गेलो आणि मी माझ्याच अवयवांवर शस्त्रक्रिया करीत राहीलो.का? माझ्यात हे भणंगतेचे बीज आले कुठून? माझ्यात हे डिप्रेशन घुसवले कुणी?
जो पर्यंत माझ्यातल्या सम्यक दृष्टीवर मीच ओढवून घेतलेले पांघरून टरकावत नाही.तो पर्यंत मी आता थांबणार नाही.आता माझे हॉस्पीटल्स.माझे विद्यापीठे.माझे होलसेल दुकाने.माझे इंजीनियर्स अँड बिल्डर्स.माझे थीएटर्स-मल्टीप्लेकसेस.माझे आँरनामेंटल कॉम्प्लेक्सेस.माझे थ्री स्टार फाइव्ह स्टार रेस्टॉरंट्स.माझे पेट्रोल पंप्स.माझ्या बँका. माझ्या ट्रॅव्हल एजेंसीज.माझे शॉपिँग मॉल्स.आता मला हे उभ करायच आहे.मला मदत घेता आली पाहिजे सधन आणि समृद्ध वर्गाची.मला शिकायचीय इथल्या गुलाबी रस्त्यांची भाषा.
माझ्या डोळ्यासमोर आता मला नाचवता आली पाहिजेत प्रस्थापीत व्यवस्थेची उघडी नागडी अपत्ये,सहजगत्या.मला कडेवर घ्यायचंय एखाद्या कट्टर विचारसरणीतलं गोंडस बाळ.त्याला खेळवायच.त्याच्या निष्पाप डोळ्यांना दिसू द्यायचीय माझी अस्सल प्रेमार्तता.माझ्यातल्या जीवंत भुकेची झगझगीत आरास पुस्तकापुस्तकातून येऊ द्यायचीय बिनधास्त...वचनवेडी...!!!
मला दिसू लागले माझे पाय.माझे दुखरे खांदे उडू लागले फडाफडा. माझ्या डोळ्यात तरारुन आलेत दीक्षाभुमीचे कोंब. आता विस्तारतोय माझ्या खोडाचा घेर. आता शाकीय प्रवर्धनाने मी पुन्हा पुन्हा उगवेन .पुन्हा पुन्हा...
***

No comments:

Post a Comment

सहवास